मुंबई : रस्त्यांवरील खड्डे, पावसाळ्यात होणारी वाहतूककोंडी आणि त्यातून होणारी गैरसोय यामुळे नागरिक संतापले आहेत. आता या विषयावर प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवन याने थेट भूमिका घेतली आहे. त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक महत्त्वपूर्ण उपाय सुचवला आहे.
सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
सुमीत राघवनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘Digital Innova Africa’ या पेजवरील जर्मनीमधील खास तंत्रज्ञानावरील व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की क्रश्ड ग्रॅनाइट वापरून असे रस्ते तयार होतात, जे पावसाचे पाणी काही मिनिटांत शोषून घेतात. त्यामुळे रस्त्यावर पाणी साठत नाही आणि खड्डे पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
“वर्षानुवर्षे सांगतोय… ऐका”
हा व्हिडीओ शेअर करताना सुमीतने लिहिलं की, “रस्त्यावरची कुत्री, कबुतरं, हिंदी सक्ती यापेक्षा आपल्या राज्यात आणि देशात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कृपा करून हे बघा.” तसेच कमेंटमध्ये त्याने “वर्षानुवर्षे सांगतोय… कृपया ऐका” असे लिहिले.
नेटिझन्सकडून कौतुक
सुमीतच्या या भूमिकेचे नागरिकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे. अनेकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर आपला रोष व्यक्त केला असून या तंत्रज्ञानाचा विचार सरकारने करावा अशी मागणी केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ही तंत्रज्ञानात्मक पद्धत उपयोगी ठरू शकते असे मत व्यक्त केले जात आहे.















