US Shutdown: अमेरिकेत पुन्हा एकदा शटडाउन लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फंडिंग बिल मंजूर न झाल्यामुळे अनेक सरकारी विभाग तात्पुरते बंद करण्याची वेळ आली आहे. याचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांवर होणार असून अनेकांना विनावेतन रजेला पाठवण्यात येणार आहे. तर काहींना पगाराशिवायच काम करावं लागेल.
शटडाउन म्हणजे काय?
जेव्हा अमेरिकन संसद (सीनेट) वार्षिक फंडिंग बिल मंजूर करण्यात अपयशी ठरते, तेव्हा सरकारचे काही खर्च थांबवले जातात. या प्रक्रियेलाच शटडाउन म्हणतात. अशा वेळी सरकारी विभागांतील काही कामे बंद पडतात. याचा परिणाम सोशल सिक्युरिटीपासून ते एअर ट्रॅव्हलपर्यंत अनेक सेवांवर होतो.

US Shutdown News
कोणत्या सेवा सुरू राहतील
राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य कार्य, कायदा अंमलबजावणी, आपत्कालीन आरोग्य सेवा आणि मेल डिलिव्हरी सुरू राहतील.
FBI, CIA अधिकारी तसेच एअरपोर्टवरील सुमारे 50,000 कर्मचारी काम करतील, मात्र त्यांना पगार मिळणार नाही.
काही नॅशनल पार्क्स मर्यादित कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील, तर काही बंद होतील.
मेडिकेअर योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना औषधे मिळत राहतील.
माजी सैनिकांसाठीच्या आरोग्य सेवा सुविधा सुरू राहतील.
कोणकोणते विभाग ठप्प होणार
शिक्षण विभागातील जवळपास 87% कर्मचाऱ्यांना रजेला पाठवलं जाईल.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि रोग नियंत्रण-प्रतिबंध केंद्रातील कर्मचाऱ्यांची मोठी कपात होईल.
तब्बल 7.5 लाख कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय रजा घ्यावी लागेल.
कर्मचारी विभागातील 41% कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल.
अमेरिकेला यावेळी जवळपास 400 मिलियन डॉलर्सचं नुकसान सहन करावं लागू शकतं.
दूतावासावर परिणाम
शटडाउननंतर भारतातील अमेरिकन दूतावासाने आपल्या X अकाउंटवर अपडेट देणं थांबवलं आहे. दूतावासानं स्पष्ट केलं की शटडाउन संपेपर्यंत नियमित अपडेट दिले जाणार नाहीत. मात्र तातडीची माहिती असेल तर ती शेअर केली जाईल.
अमेरिकेत कधी-कधी शटडाउन झाले?
| वर्ष | सुरू होण्याची तारीख | कालावधी (दिवसांत) | संपण्याची तारीख |
|---|---|---|---|
| 2019 | 21 डिसेंबर 2018 | 34 | 25 जानेवारी 2019 |
| 2018 | 19 जानेवारी 2018 | 2 | 22 जानेवारी 2018 |
| 2014 | 30 सप्टेंबर 2013 | 16 | 17 ऑक्टोबर 2013 |
| 1996 | 13 नोव्हेंबर 1995 | 5 | 19 नोव्हेंबर 1995 |
| 1996 | 15 डिसेंबर 1995 | 21 | 6 जानेवारी 1996 |
| 1991 | 5 ऑक्टोबर 1990 | 3 | 9 ऑक्टोबर 1990 |
| 1988 | 18 डिसेंबर 1987 | 1 | 20 डिसेंबर 1987 |
| 1987 | 16 ऑक्टोबर 1986 | 1 | 18 ऑक्टोबर 1986 |
| 1985 | 30 सप्टेंबर 1984 | 2 | 3 ऑक्टोबर 1984 |
निष्कर्ष
अमेरिकेतील शटडाउनमुळे लाखो कर्मचाऱ्यांचं आयुष्य विस्कळीत होणार असून पगाराशिवायच काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आवश्यक सेवा सुरू राहतील, पण शिक्षण, आरोग्य व इतर विभागांवर मोठा परिणाम होणार आहे.














