जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोमवारची सकाळ चकित करणारी ठरली. जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरची कमजोरी आणि रुपयाचा निच्चांक या तिहेरी दबावामुळे शहरातील सोन्याने नवा उच्चांक गाठला असून दिवाळीपर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जागतिक बाजारातील बदलांचा प्रभाव
अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता आणि डॉलर कमकुवत झाल्याने गेल्या काही दिवसांत सोने व चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. इक्विटी आणि रिअल इस्टेटसारख्या गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा सोन्यातून जास्त परतावा मिळू लागल्याने गुंतवणूकदारांचा कलही सोन्याकडे वाढतो आहे. जागतिक स्तरावर सोन्याची किंमत सध्या प्रति औंस 3,800 डॉलरपर्यंत पोहोचली असून ती 4,800 डॉलर ओलांडू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
जळगावमधील सोन्याच्या दरात विक्रमी उसळी
गेल्या काही महिन्यांत जळगावमधील सोन्याच्या दरात जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,17,317 रुपये होता. शनिवारी तो फक्त 103 रुपयांनी वाढून 1,17,420 रुपयांवर गेला. मात्र सोमवार सकाळी बाजार उघडताच सोन्याने तब्बल 1,957 रुपयांची झेप घेतली आणि प्रति 10 ग्रॅम 1,19,377 रुपयांवर पोहोचला. यामुळे दसऱ्यापूर्वी सोनं 1,20,000 रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
ग्राहक आणि व्यावसायिक दोघांनाही धक्का
शनिवारी किंमतींमध्ये किरकोळ वाढ झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला होता. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आलेल्या या अचानक वाढीने सर्वांनाच धक्का बसला. स्थानिक सुवर्ण व्यापाऱ्यांच्या मते जागतिक पातळीवरील अनिश्चितता, युद्धसदृश परिस्थिती आणि आर्थिक मंदी यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. त्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कर आणि आयात शुल्काचा थेट परिणाम
भारतामध्ये बहुतांश सोने आयात केले जाते. त्यामुळे सीमा शुल्क, जीएसटी आणि स्थानिक करांचा सोन्याच्या अंतिम किमतीवर थेट परिणाम होतो. याच कारणामुळे जागतिक दरवाढ भारतातील बाजारपेठेत आणखी जास्त दिसून येते.









