EPFO (Employees’ Provident Fund Organisation) आपल्या सदस्यांना मोठा दिलासा देणारी योजना आणण्याच्या तयारीत आहे. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर येत्या जानेवारी 2026 पासून PF खात्यातील काही रक्कम थेट एटीएममधून काढता येऊ शकते.
निर्णयासाठी CBT बैठकीची प्रतीक्षा
EPFOचा सर्वोच्च निर्णय घेणारा सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) याबाबतचा अंतिम निर्णय ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातील बैठकीत घेणार आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, CBTच्या एका सदस्याने सांगितले की EPFOचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर या प्रकारच्या व्यवहारासाठी तयार आहे. मात्र, एटीएमद्वारे किती रक्कम काढता येईल याबाबतची मर्यादा ठरवणे बाकी आहे.
EPFO फंड आणि सदस्यसंख्या
सध्या EPFOकडे 28 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आहे आणि एकूण सुमारे 78 मिलियन सदस्य आहेत. 2014 मध्ये हा आकडा फक्त 7.4 लाख कोटी रुपये आणि 33 मिलियन सदस्यांपर्यंत मर्यादित होता. निधीची ही प्रचंड वाढ पाहता सदस्यांना त्यांच्या पैशापर्यंत सोपी आणि जलद पोहोच देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
मंत्रालयाचा पुढाकार
श्रम मंत्रालयाने या सुविधेसाठी आधीच बँका आणि रिझर्व्ह बँकेसोबत चर्चा केली आहे. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, सदस्यांना त्यांच्या जमा कोषाचा थेट आणि सुलभ वापर मिळावा म्हणून ही योजना महत्वाची ठरेल.
विशेष कार्डची शक्यता
स्रोतांच्या माहितीनुसार, EPFO सदस्यांना खास स्पेशल कार्ड देऊ शकते ज्याद्वारे एटीएममधून थेट PF रक्कम काढता येईल. सध्या PF रक्कम काढताना प्रक्रियात्मक विलंब आणि कागदोपत्री कामामुळे अडथळे येतात. आपत्कालीन परिस्थितीत या नवीन सुविधेमुळे निधी मिळवणे सोपे होईल. मात्र, ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी EPFOला आपले डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग सिस्टीमसोबत समन्वय अधिक मजबूत करावा लागेल.









