काळा आणि जळालेला लोखंडी तवा किंवा कढई बिना मेहनत घेता नव्या सारखी करण्यासाठी ही पद्धत वापर

आपल्या पैकी बहुतेक लोकांच्या घरामध्ये लोखंडी तवा, कढई किंवा इतर भांडी असतील जी पदार्थ बनवताना जळाली देखील असतील त्यामुळे त्यांना पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप मेहनत घेऊन त्यांना स्टीलचा स्क्रबर वापरून जोर लावून घासत असाल. पण आज आम्ही जी पद्धत तुम्हाला सांगत आहोत त्यामध्ये आपल्याला शक्ती लावून जोरदार घासण्याची मुळीच गरज नाही तर अगदी कमी मेहनतीने भांडी चमकदार बनवण्याची ट्रिक आहे. चला तर पाहू काळा आणि जळालेला लोखंडी तवा किंवा कढई बिना मेहनत घेता नव्या सारखी करण्याची पद्धत काय आहे.

या पद्धती मध्ये आपल्याला फक्त दोन वस्तूंची गरज आहे. पहिली वस्तू म्हणजे एक ते दोन लिंबू आणि दुसरी वस्तू थोडे मीठ. या दोन्ही वस्तू आपल्या घरा मध्ये सहज उपलब्ध असतातच. त्यामुळे आपण या पद्धतीचा वापर करून केव्हाही लोखंडी भांडी नव्या सारखी चमकदार करू शकता. चला पुढे जाणून घेऊ संपूर्ण पद्धत काय आहे.

सगळ्यात पहिले आपल्याला जे भांडे स्वच्छ चमकदार करायचे आहे त्यास गैसवर गरम करायला ठेवा. या उदाहरणामध्ये आपण लोखंडी तवा स्वच्छ कसा केला ते पाहू. आपण सुद्धा लोखंडी तवा स्वच्छ करू इच्छित असाल तर आपण लोखंडी तव्यावर पोळी करत असाल तर पोळी झाल्यावर लगेच गैस सुरु असतानाच हा प्रयोग करा. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा तवा गरम करण्यासाठी गैस आणि वेळ वाया घालवावा लागणार नाही.

तवा चांगला गरम झाल्यानंतर आपण लिंबाचे दोन तुकडे करून घ्या. त्यापैकी लिंबाच्या अर्ध्या भागात सालीच्या बाजूने काट्याचा चमचा (fork) घुसावा म्हणजे आपण हा लिंबू चमच्याच्या मदतीने लोखंडी तव्यावर व्यवस्थित घासू शकू आणि आपल्याला चटका बसणार नाही. आपल्याला वाटल्यास फोर्क म्हणजेच काटेरी चमचा न वापरता देखील सरळ हाताने लिंबू तव्यावर घासू शकता. लक्षात असू द्या आपल्याला गैस सुरूच ठेवायचा आहे आणि गरम तव्यावर चटका बसणार नाही याची काळजी घेत लिंबू तव्यावर हलक्या हाताने घासायचा आहे. अधून मधून लिंबू पिळून त्यामधील रस तव्यावर घासत राहा. आपल्या लक्षात येईल आपण जेथे लिंबू तव्याला चोळत आहे तेथील काळा आणि जळालेला भाग हळू हळू पांढरा चमकदार होत आहे.

साधारण दोन ते तीन मिनिट वरील प्रमाणे लिंबू चोळून लोखंडी तवा स्वच्छ करा त्यानंतर तव्यावर थोडे मीठ घालून पुन्हा दोन मिनिट जेथे जेथे काळेपणा शिल्लक आहे तेथे लिंबू रस आणि मीठ यांचे मिश्रण लिंबाच्या मदतीनेच चोळा. आपल्या मना प्रमाणे चमकदार लोखंडी तवा चार ते पाच मिनिटा मध्ये दिसायला लागेल त्यानंतर गैस बंद करून तवा थंड होऊ द्या.

आता थंड झालेला तवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. लोखंडी तवा नव्या सारखा चमकदार दिसायला लागेल. यामधून लिंबाचा वास दूर करण्यासाठी आपण कोणत्याही डिटर्जंट किंवा डिशवोशर वापरून स्टीलच्या स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा.

यामुळे आपला लोखंडी तवा अगदी नव्या सारखा दिसेल. आपल्याला कदाचित फार मेहनत असल्या सारखी पद्धत वाचल्या नंतर वाटू शकते परंतु जेव्हा प्रत्यक्ष कृती कराल तेव्हा लक्षात येईल कि कोणतीही मेहनत न घेता झटपट तवा स्वच्छ होत आहे.

आपण वरील फोटो मध्ये पाहू शकता पहिल्या फोटो मध्ये असलेला काळा जळालेला तवा अगदी नव्या प्रमाणे चमकदार झाला आहे. या पद्धतीचा वापर करून आपण कोणत्याही लोखंडी भांड्याला लखलखीत चमकदार करू शकता. ते देखील कोणतीही शक्ती किंवा जोर न वापरता. तर तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक, आवडली तर इतरांना देखील सांगा.