भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मौद्रिक धोरण समिती (MPC) च्या बैठकीचे निकाल जाहीर झाले असून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की सध्या रेपो रेट 5.5% वर कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच बँक कर्जांच्या EMI मध्ये कोणताही फरक होणार नाही.
गेल्या काही महिन्यांत व्याजदरात सातत्याने कपात झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात RBI ने रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
GDP ग्रोथच्या अंदाजात वाढ
रेपो रेट स्थिर ठेवताच RBI ने भारतीय अर्थव्यवस्थेला सकारात्मक बातमी दिली आहे. केंद्रीय बँकेने FY26 साठी GDP ग्रोथचा अंदाज 6.5% वरून वाढवून 6.8% केला आहे. देशांतर्गत मागणीत वाढ, गुंतवणुकीत सातत्याने होत असलेली भर आणि स्थिर आर्थिक वातावरण यामुळे हा अंदाज सुधारण्यात आल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.
वेगवेगळ्या तिमाहींसाठी GDP अंदाज पुढीलप्रमाणे आहेत:
| तिमाही | आधीचा अंदाज | नवा अंदाज |
|---|---|---|
| Q2 FY26 | 6.7% | 7% |
| Q3 FY26 | 6.6% | 6.4% |
| Q4 FY26 | 6.3% | 6.2% |
महागाई दरात घट होण्याची शक्यता
RBI च्या अंदाजानुसार महागाई दरातही घट होऊ शकते. FY26 साठी रिटेल महागाईचा अंदाज 3.1% वरून कमी करून 2.6% करण्यात आला आहे. GST रिफॉर्म्सचा परिणाम महागाईवर दिसणार असल्याचे RBI ने सांगितले.
महत्त्वाचे बदल असे:
Q2 मध्ये 2.1% वरून घटून 1.8%
Q3 मध्ये 3.1% वरून घटून 1.8%
Q4 मध्ये 4.4% वरून घटून 4%
Q1 FY27 मध्ये 4.9% वरून घटून 4.5%
या वर्षी 3 वेळा रेपो रेट कट
2025 मध्ये आतापर्यंत तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये RBI ने एकूण 100 बेसिस पॉइंट्सने रेपो रेट कमी करून 6.5% वरून 5.5% केला. पण या वेळेस अपेक्षेप्रमाणे 25 बेसिस पॉइंट्सची कपात न करता RBI ने स्थिरता राखली आहे.
रुपयावर दबाव, RBI सज्ज
भारतीय रुपयाबाबत बोलताना गव्हर्नर म्हणाले की रुपया दबावाखाली आहे, मात्र गरज पडल्यास RBI आवश्यक पावले उचलायला मागेपुढे पाहणार नाही. SDF रेट 5.25% आणि MSF रेट 5.75% वर कायम ठेवण्यात आले आहेत.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ती व्याजदराची पातळी ज्यावर RBI देशातील बँकांना कर्ज देते. रेपो रेट कमी झाल्यास बँकांना स्वस्त कर्ज मिळते आणि त्याचा फायदा ग्राहकांना मिळतो. म्हणजेच Home Loan, Auto Loan किंवा Personal Loan घेणाऱ्या ग्राहकांच्या EMI मध्ये घट होते. तर, रेपो रेट वाढल्यास बँका कर्जावर व्याजदर वाढवतात.
Disclaimer
ही माहिती फक्त शैक्षणिक आणि सामान्य माहितीसाठी आहे. गुंतवणूक किंवा कर्ज घेण्यापूर्वी नेहमी वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्यावा.









