Ladki Bahin Yojana eKYC: मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा देणारी माहिती दिली आहे. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या ई-केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर होती. मात्र, आता ही मुदत वाढवून 31 डिसेंबरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ई-केवायसीची मुदत का वाढवली?
मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की दोन महिने चाललेल्या ई-केवायसी प्रक्रियेत अनेक पात्र महिलांना अडचणी येत होत्या. विशेषतः आधारशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी न आल्याने अनेकांचे ई-केवायसी अपूर्ण राहत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानंतर मुदत एक महिना वाढवण्यात आली आहे. यामुळे कोणतीही पात्र लाभार्थी महिला योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँक खाते तिच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. ई-केवायसी करताना आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याशी जोडलेल्या मोबाईलवर येणारा ओटीपी पडताळला जातो. अनेकांच्या नोंदणीमध्ये अडचणी येत असल्याने मुदतवाढ गरजेची होती.
योजनेअंतर्गत किती मदत मिळते?
राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून महायुतीच्या विजयामागे ही योजना एक कारण मानली जाते.








