2005 मध्ये केंद्र सरकारने हिंदू उत्तराधिकार कायद्यात मोठा बदल केला होता. या बदलामुळे मुलींच्या हक्कांमध्ये ऐतिहासिक सुधारणा झाली. मात्र तरीही अनेकांना अजूनही या कायद्याबाबत अज्ञान आहे. विशेषतः ग्रामीण भागात किंवा पारंपरिक विचारसरणी असलेल्या कुटुंबांमध्ये मुली अजूनही वडिलांच्या मालमत्तेवर आपला हक्क मागण्यास संकोच करतात. परिणामी, त्यांचा कायदेशीर अधिकार असूनही त्यांना वारसाहक्कापासून वंचित रहावे लागते.
कायद्यात झाला होता ऐतिहासिक बदल
2005 मध्ये सरकारने बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा विचार करून हिंदू उत्तराधिकार अधिनियमात (Hindu Succession Act) मोठा बदल केला. या बदलामुळे पित्याच्या मालमत्तेवर मुलगी आणि मुलगा दोघांचा समान अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित – या अधिकारात कोणताही फरक पडणार नाही. या सुधारणेचा उद्देश मुलींसाठी समानतेचा मार्ग मोकळा करणे हाच होता.
वडिलांच्या खाजगी आणि वडिलोपार्जित मालमत्तेत समान हिस्सा
कायद्यातील या सुधारणेनंतर मुलींना आता केवळ वडिलांनी स्वतःच्या कमाईने घेतलेल्या मालमत्तेतच नव्हे, तर वडिलोपार्जित संपत्तीमध्येही समान हिस्सा मिळतो. म्हणजेच जर एखाद्या वडिलांनी काही मालमत्ता स्वतःच्या कमाईने विकत घेतली असेल, तर त्यामध्ये जितका हिस्सा मुलाचा असेल तितकाच हिस्सा मुलीचाही असेल. याशिवाय जर वडिलांना त्यांच्या वडिलांकडून किंवा पूर्वजांकडून काही संपत्ती वारशाने मिळाली असेल, तर त्यामध्येही मुलीचा तितकाच अधिकार राहील.
2005 पूर्वी विवाहित मुलींना वडिलोपार्जित संपत्तीवर फारसा हक्क मिळत नव्हता. पण सुधारित कायद्यानंतर हा अन्याय दूर करण्यात आला आहे.
वडिलांनी मृत्युपत्र तयार केले असल्यास काय?
जर वडिलांनी त्यांच्याच हयातीत मृत्युपत्र तयार केले असेल, तर परिस्थिती काहीशी वेगळी असते. वडिलांना त्यांच्या संपत्तीचं वाटप आपल्या इच्छेनुसार करण्याचा अधिकार आहे. मृत्युपत्रामध्ये जर स्पष्टपणे नमूद केले असेल की, संपत्ती केवळ मुलांनाच मिळेल, तर मुलींना ते मृत्युपत्र आव्हान देण्याचा अधिकार नाही. मात्र, हे नियम फक्त पित्याने स्वतःच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी लागू होतात. वडिलोपार्जित मालमत्तेसाठी हे लागू होत नाही.
कायद्यानुसार, वडिलांनी स्वतः तयार केलेले मृत्युपत्र केवळ त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेसाठीच लागू होते. वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये 2005 नंतर मुलगा आणि मुलगी दोघेही समान वारसदार मानले जातात.
Disclaimer: या लेखातील माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिली आहे. संपत्ती, मृत्युपत्र किंवा वारसा यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे.









