Name Change On Train TIcket: भारतीय रेल्वे दररोज कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियम आणि सेवा सुरू केल्या आहेत. अनेकदा प्रवासाचे तिकीट आधीच बुक केले जाते, पण अचानक काही कारणांमुळे स्वतः प्रवास करणे शक्य होत नाही. अशा वेळी तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देता येते का, हा प्रश्न अनेकांना पडतो. बहुतांश लोकांना हे शक्य नाही असे वाटते, परंतु भारतीय रेल्वेने यासाठी खास पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
कन्फर्म तिकीटवर नाव बदलण्याची मुभा
रेल्वे ही सोय फक्त कन्फर्म तिकीटवर देते. वेटिंग लिस्ट (WL) किंवा RAC तिकीटांवर नाव बदलता येत नाही. नाव बदलण्याचा अधिकार केवळ जवळच्या नातलगांपुरता मर्यादित आहे. यात आई-वडील, पती-पत्नी, भाऊ-बहिणी आणि मुलगा-मुलगी यांचा समावेश होतो. सरकारी कर्मचारी आपल्या विभागाच्या लेखी विनंतीनुसारही ही सुविधा घेऊ शकतात.
रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन सुटण्याच्या किमान 24 तास आधी तिकीट रेल्वे काउंटरवर सादर करणे आवश्यक आहे. एकाच तिकीटावर केवळ एकदाच नाव बदलण्याची परवानगी आहे. अचानक प्रवास रद्द करावा लागल्यास कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला ही सोय मोठा दिलासा देते.
नाव बदलण्याची प्रक्रिया
ही संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइनच होते. तिकीट ऑनलाइन बुक केले असले तरी प्रवाशाने प्रिंटआउटसह जवळच्या आरक्षण काउंटरवर जावे लागते. काउंटरवर नवीन प्रवाशाची माहिती असलेला फॉर्म भरावा लागतो. यासोबत जुन्या व नवीन प्रवाशाचे ओळखपत्र—आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र—यांपैकी कोणतेही एक दाखवणे आवश्यक आहे.
सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी तिकीटावर नवीन नाव नोंदवतो आणि त्याची पावती किंवा अपडेटेड तिकीट देतो. त्यामुळे प्रवाशाला तिकीट रद्द करून पुन्हा बुक करण्याची गरज राहत नाही आणि कॅन्सलेशन चार्जही वाचतो.
महत्वाच्या अटी
फक्त कन्फर्म तिकीटवरच ही सुविधा लागू
ट्रेन सुटण्याच्या किमान 24 तास आधी अर्ज आवश्यक
जवळच्या नातलगांमध्येच नाव बदलण्यास परवानगी
एका तिकीटावर एकदाच नाव बदल शक्य









