दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जीएसटी 2.0 अंतर्गत मोठा दिलासा देण्यात आला आहे. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कर दरांमधील कपातीचा थेट फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचला असून त्याचा परिणाम बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे.
निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारने 54 दैनंदिन वापराच्या वस्तूंवर बारकाईने लक्ष ठेवले आहे आणि जीएसटी सुधारांमुळे या सर्व वस्तूंवरील कर लाभ लोकांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “पंतप्रधानांचा दिवाळीचा तोहफा आता खर्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचला आहे.” काही व्यापाऱ्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक कर सवलत ग्राहकांना दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने गेल्या महिन्यातच जीएसटी प्रणालीत मोठे बदल केले. खाद्यपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तूंसह टीव्ही, फ्रिज आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील करदर कमी करण्यात आले. हा बदल २२ सप्टेंबर रोजी म्हणजेच नवरात्रीच्या सुरुवातीपासून लागू झाला.
वाहन विक्रीत उत्साहजनक वाढ
जीएसटी दरकपातीमुळे ग्राहकांच्या हातात जास्त पैसे राहिले, त्यामुळे वाहन क्षेत्रात जोरदार विक्री झाली. तीन चाकी वाहनांच्या विक्रीत ५.५% वाढ झाली असून दोनचाकी वाहनांची विक्री तब्बल २१.६ लाख युनिटपर्यंत पोहोचली. सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहनांची डिस्पॅच ३.७२ लाख युनिटपर्यंत गेली आहे. हीरो मोटर्सनेही सप्टेंबरमध्ये आपली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली.
एअर कंडिशनरची विक्री जीएसटी सुधार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी दुप्पट झाली, तर टीव्ही विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात विक्रमी मागणी
वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, नवरात्रीदरम्यान वाहन विक्रीत जबरदस्त वाढ झाली. मारुती सुजुकीने पहिल्या आठ दिवसांतच १.६५ लाख गाड्या विकल्या. महिंद्राच्या विक्रीत ६०% वाढ झाली, तर टाटा मोटर्सने ५०,००० हून अधिक वाहने विकली. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रानेही सर्व विक्रम मोडले आहेत.
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खपात सुमारे २० लाख कोटी रुपयांनी वाढ होईल. त्यांनी सांगितले की, जीएसटी सुधारांमुळे इलेक्ट्रॉनिक्स विक्रीत २५% वाढ झाली असून, खाद्य वस्तूंच्या किंमतीतही घट झाली आहे. यामुळे उत्पादन उद्योगाला थेट चालना मिळत आहे.
पीयूष गोयल यांनी म्हटले की, “ही सुधारणा स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी आर्थिक पाऊल आहे. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळातही भारताची वाढ दर मजबूत राहिली आहे. त्यामुळे IMF नेही भारताच्या वाढीचा अंदाज ६.६% पर्यंत वाढवला आहे.”









