EPFO च्या नव्या नियमांवर सध्या देशभर चर्चा सुरू आहे. अनेकांना नोकरी गेल्यानंतर लगेच पूर्ण पीएफ रक्कम काढता येईल का, असा प्रश्न पडला आहे. EPFO ने आता या सर्व शंकांचे निरसन करत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
नवीन नियम काय सांगतो?
EPFO च्या मते, सदस्य आता नोकरी सुटल्यावर लगेच आपल्या पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम काढू शकतात. मात्र उर्वरित 25 टक्के रक्कम एक वर्षानंतरच मिळेल. यामागे सरकारचा उद्देश म्हणजे सदस्यांची सलग 10 वर्षांची सेवा कायम ठेवणे, जेणेकरून त्यांना पेन्शनसाठी पात्र होता येईल.
पेन्शन पैसे कधी मिळतील?
EPFO ने स्पष्ट केले आहे की, पेंशन (EPS) अंतर्गत जमा झालेली रक्कम बेरोजगारीनंतर 36 महिन्यांनीच काढता येईल. पूर्वी ही मुदत केवळ 2 महिने होती. हा बदल EPFO ने कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन फायद्यासाठी केल्याचा दावा केला आहे.
100% रक्कम लगेच का मिळत नाही?
जर एखादा कर्मचारी नोकरी गेल्यानंतर लगेचच संपूर्ण रक्कम काढतो, तर त्याची सेवा कालावधी खंडित होते. पेन्शनसाठी सलग 10 वर्षांची सेवा आवश्यक आहे. त्यामुळे 75% रक्कम तातडीने आणि 25% एक वर्षानंतर देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सरकारचे मत आहे की, बहुतांश कर्मचाऱ्यांना एका वर्षात नवी नोकरी मिळते.
नियम बदलण्यामागचे कारण
श्रम मंत्रालयाच्या मते, या बदलाचा उद्देश कर्मचार्यांना दीर्घकाळ सेवेत राहण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. पूर्वी वारंवार पीएफ काढल्याने सेवा कालावधी तुटायचा आणि त्यामुळे पेन्शन पात्रतेवर परिणाम व्हायचा. नव्या नियमामुळे EPS पेन्शनचा लाभ अधिक लोकांना मिळेल.
पैसे काढण्याच्या कॅटेगरी कमी केल्या
पूर्वी पीएफ काढण्यासाठी 13 विविध कॅटेगरी होत्या, पण आता त्या फक्त 3 केल्या गेल्या आहेत. पहिली- शिक्षण, विवाह आणि आजारासाठी; दुसरी- घरासाठी; आणि तिसरी- आपत्कालीन परिस्थितीसाठी पीएफ काढता येईल.
आंशिक पैसे काढण्यासाठी सवलत
आता कर्मचारी विवाह आणि घरासाठी दरवर्षी एकदा पीएफ रक्कम काढू शकतात. पूर्वी ही मर्यादा 5 ते 7 वर्षांची होती. तसेच शिक्षणासाठी 10 वेळा आणि विवाहासाठी 5 वेळा निकासी करता येणार आहे. आजारपणाच्या आपत्कालीन प्रसंगी सदस्य वर्षातून दोनदा संपूर्ण पात्र रक्कम काढू शकतील.









