8th Pay Commission: देशातील सुमारे 1.1 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या अहवालानुसार, या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांचे पगार जवळपास 30 ते 34 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
वेतन आणि पेन्शनमध्ये होणार लक्षणीय वाढ
ब्रोकरेज फर्म ‘एम्बिट कॅपिटल’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, आठव्या वेतन आयोगामुळे सुमारे 1.1 कोटी लोकांना लाभ मिळणार असून त्यात 44 लाख सध्याचे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68 लाख निवृत्त कर्मचारी (पेंशनर्स) यांचा समावेश आहे. नव्या वेतन संरचनेनुसार वेतन आणि पेन्शनमध्ये 30 ते 34 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. हा नवीन वेतनमान जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी आयोगाची स्थापना, अहवाल तयार होणे, सरकारकडे पाठवला जाणे आणि त्यास मान्यता मिळणे आवश्यक आहे.
8व्या वेतन आयोगाचा लाभ कोणाला मिळणार?
या वेतन आयोगाचा थेट फायदा केंद्र सरकारच्या 44 लाख कर्मचाऱ्यांना आणि सुमारे 68 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल. यामध्ये मूल वेतन, भत्ते आणि निवृत्ती नंतरचे फायदे यात लक्षणीय सुधारणा होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण पगार अधिक स्थिर आणि फायदेशीर होणार आहे.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर हे वेतन निश्चित करण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे गणितीय सूत्र आहे. हे सध्याच्या मूळ वेतनावर गुणाकार करून नवीन वेतन ठरवले जाते. उदाहरणार्थ, 7व्या वेतन आयोगात 2.57 हा फिटमेंट फॅक्टर वापरण्यात आला होता, ज्यामुळे किमान मूल वेतन 7,000 रुपयांवरून वाढवून 18,000 रुपये प्रति महिना करण्यात आले होते. यावेळी हा फॅक्टर 1.83 ते 2.46 दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्मचारी आणि पेंशनर्सच्या वेतनवाढीमध्ये हाच महत्त्वाचा घटक ठरणार आहे.
मागील वेतन आयोगांचा वेतन वाढीवरील परिणाम
2006 साली लागू झालेल्या 6व्या वेतन आयोगात एकूण वेतन आणि भत्त्यांमध्ये सुमारे 54 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगात बेसिक पगारात 14.3% वाढ झाली, तर अन्य भत्त्यांसह एकूण पगारात जवळपास 23% वाढ नोंदवली गेली. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाकडूनही मोठ्या वाढीची अपेक्षा आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या वेतनाचे गणित काय आहे?
एक सरकारी कर्मचारी हा वेतन स्वरूपात मूळ वेतन, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता (TA), तसेच इतर छोटेमोठे भत्ते मिळवतो. यामध्ये मूळ वेतनाचा वाटा आधी 65% होता, जो आता कमी होऊन 50% च्या आसपास राहिला आहे. उर्वरित वेतन भत्त्यांमधून मिळतो. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा परिणाम होणार आहे, मात्र त्यांना HRA किंवा TA मिळणार नाही.
Disclaimer:
या लेखात दिलेली माहिती वेगवेगळ्या माध्यमांच्या अहवालांवर आधारित आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून अंतिम घोषणा अद्याप झालेली नाही. कृपया अधिकृत घोषणेसाठी केंद्र सरकारच्या अधिसूचना आणि अधिकृत स्त्रोतांचा संदर्भ घ्या.









