भारतामध्ये GST 2.0 लागू झाल्यानंतर कॉम्पॅक्ट SUV खरेदी करणे आता आधीपेक्षा अधिक किफायतशीर झाले आहे. केंद्र सरकारने 28 टक्के कर असलेला स्लॅब कमी करून 18 टक्के केला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना थेट आर्थिक दिलासा मिळाला असून Maruti Suzuki Brezza, Hyundai Venue, Kia Sonet, Tata Nexon आणि Mahindra XUV 3XO सारख्या लोकप्रिय SUV आता लक्षणीय प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. किंमतीत 30 हजार रुपयांपासून 1.50 लाख रुपयांपर्यंत घट झाली आहे.
MARUTI SUZUKI BREZZA
Maruti Brezza ला GST बदलांचा थोडा फायदा झाला आहे. या मॉडेलमध्ये 1.5-लीटर इंजिन आहे ज्यावर आधी 45% कर आकारला जात होता. तो आता 40% झाला आहे. परिणामी Brezza च्या किंमतीत 30,000 ते 48,000 रुपयांपर्यंत घट झाली आहे. नवी एक्स-शोरूम किंमत आता 8.39 लाख ते 13.50 लाख रुपयांदरम्यान आहे.
HYUNDAI VENUE
Hyundai Venue ला GST 2.0 मधून सर्वाधिक लाभ मिळाला आहे. आधी याच्या पेट्रोल इंजिनवर 29% आणि डिझेलवर 31% कर लागू होता. आता दोन्ही इंजिन 18% स्लॅबमध्ये आले आहेत. यामुळे Venue ची किंमत 68,000 ते 1.32 लाख रुपयांपर्यंत कमी झाली आहे. नवी किंमत 7.26 लाख ते 12.05 लाख रुपयांपर्यंत आहे.
KIA SONET
Kia Sonet वर देखील GST कपातीचा थेट परिणाम झाला आहे. आधी याची किंमत 8 लाख ते 15.74 लाख रुपयांदरम्यान होती. आता 70,000 ते 1.64 लाख रुपयांपर्यंत घट झाली असून नवी किंमत 7.30 लाख ते 14.10 लाख रुपयांदरम्यान निश्चित झाली आहे.
TATA NEXON
भारतामधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV पैकी Tata Nexon वर GST 2.0 चा मोठा प्रभाव दिसून आला आहे. आधी पेट्रोल व डिझेलनुसार वेगवेगळा कर आकारला जात होता, पण आता सर्वांवर 18% स्लॅब लागू झाला आहे. त्यामुळे Nexon 68,000 ते 1.55 लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाली असून नवी किंमत 7.32 लाख ते 13.88 लाख रुपयांपर्यंत आहे.
MAHINDRA XUV 3XO
Mahindra ने GST 2.0 लागू होण्यापूर्वीच ग्राहकांना फायदा देण्यास सुरुवात केली होती. 6 सप्टेंबरपासूनच XUV 3XO ची किंमत कमी करण्यात आली होती. आता ही SUV 71,000 ते 1.56 लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे. नवी किंमत 7.28 लाख ते 14.40 लाख रुपयांपर्यंत आहे.
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
GST 2.0 मुळे कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये मोठा बदल घडला असून खरेदीदारांना आकर्षक दरात गाड्या घेण्याची संधी मिळत आहे. Nexon, Brezza, Venue, Sonet आणि XUV 3XO सारख्या गाड्या कमी किंमतीत उपलब्ध असल्याने नव्या SUV घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा योग्य काळ ठरू शकतो.














