Bank Holiday Today: दिवाळी अमावस्या आणि गोवर्धन पूजेच्या निमित्ताने आज, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या अंतर्गत ही अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी आज बँकांचे दरवाजे बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकिंगचे व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या शहरातील स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात आज बँकांना सुट्टी
महाराष्ट्रात आज, २१ ऑक्टोबर रोजी बँकांना दिवाळी अमावस्येच्या निमित्ताने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर २२ ऑक्टोबर, म्हणजेच बालिप्रतिपदा पाडव्याच्या दिवशी, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील बँका बंद राहतील. सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग व्यवहारावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी वाचली का?
कोणत्या शहरांमध्ये आज बँकांना सुट्टी?
आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुंबई, नागपूर, भोपाल, बेलापूर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाल, जम्मू, रायपूर आणि श्रीनगर या ठिकाणांतील बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी बँकेशी संबंधित काम आज न करता उद्या किंवा पुढील कार्यदिवशी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील सुट्ट्या आणि बँकिंगवरील परिणाम
२३ ऑक्टोबर रोजी, म्हणजे भाऊबीजेच्या निमित्ताने, गुजरात, सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बँका बंद राहतील. मात्र, त्या दिवशी महाराष्ट्रात बँका सुरू राहतील. या सलग सुट्ट्यांदरम्यान लोकांनी ऑनलाईन बँकिंग किंवा डिजिटल पेमेंटचा वापर करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
ऑनलाईन बँकिंग आणि यूपीआय व्यवहार सुरूच
बँकांचे दरवाजे बंद असले तरी, ग्राहकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि यूपीआय पेमेंट सेवा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहतील. त्यामुळे पैशांचे ट्रान्सफर, बिल पेमेंट किंवा इतर डिजिटल व्यवहार तुम्ही सहज करू शकता.
त्यामुळे आज सुट्टी असली तरी तुमच्या दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करा आणि बँकेपर्यंतचा प्रवास टाळा.









