EPFO on PF Withdrawal: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या खातेदारांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. PF रक्कम केवळ वैध कारणांसाठीच वापरावी, अन्यथा नियमभंग केल्यास दंडात्मक कारवाई टाळता येणार नाही, असा स्पष्ट संदेश ईपीएफओने दिला आहे.
वैध कारणांशिवाय पैसे काढल्यास कारवाई
PF खाते हे निवृत्ती आणि आपत्कालीन परिस्थितींसाठी सुरक्षितता देते. दरमहा ठराविक रक्कम ईपीएफओकडे जमा केली जाते जी गरजेप्रमाणे काढता येते. मात्र काही जण लक्झरी वस्तू, परदेश प्रवास किंवा इतर अनावश्यक खर्चासाठी पैसे काढतात. ईपीएफ योजना 1952 अंतर्गत हे नियमभंग मानले जात असून अशा प्रकरणात रक्कम व्याजासह वसूल करण्याचा अधिकार EPFO कडे आहे.
कोणत्या कारणांसाठी करता येईल उपसा
ईपीएफओच्या नियमानुसार घर खरेदी किंवा दुरुस्ती, शिक्षण, विवाह किंवा गंभीर आजार अशा मर्यादित कारणांसाठीच PF रक्कम काढता येते. जर खातेदाराने खोटे कारण दाखवून पैसे काढले आणि त्यांचा अन्य वापर केला, तर EPFO वसुलीची कारवाई करू शकते.
युनिफाइड पेन्शन स्कीमवर तात्पुरती स्थगिती
युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) संदर्भातील आदेश ईपीएफओने सध्या स्थगित ठेवला आहे. या निर्णयावर तपास सुरू असून लवकरच अंतिम भूमिका जाहीर केली जाईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.
पैसे काढण्याच्या मर्यादा
EPFO 3.0 अंतर्गत ATM मधून 10,000 ते 25,000 रुपये काढण्याची सुविधा असेल, मात्र दोन व्यवहारांमध्ये किमान 30 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. UPI द्वारे दररोज 2,000 ते 3,000 रुपये आणि महिन्याला जास्तीत जास्त 25,000 रुपये काढता येतील. या मर्यादांचे अंतिम अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे.
दीर्घकालीन बचतीवर भर
ईपीएफओने स्पष्ट केले की, PF खाते ही निवृत्ती सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन बचत आहे. त्यामुळे ATM द्वारे किमान 15 दिवसांचे अंतर आणि UPI द्वारे दररोज मर्यादित उपसा बंधनकारक ठेवण्यात आला आहे, जेणेकरून निधीचा गैरवापर होणार नाही.









