मुंबई : मुंबई बँकेच्या विशेष कर्ज योजनेबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. या वेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सहसचिव वि.रा. ठाकूर, वित्त विभागाच्या सहसचिव स्मिता निवतकर, सहसचिव मु.प्र. साबळे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांसाठी व्याज परतावा योजना
मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुंबई बँकेला व्याज परतावा योजनेसाठी अधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा. या योजनेत सहभागी महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभही कायम राहणार असून त्यांना अपात्र ठरवले जाणार नाही. याबाबत शासनाकडून लवकरच विशेष सूचना जारी करण्यात येतील. या उपक्रमामुळे मुंबईतील पात्र महिलांना आर्थिक सबलीकरणाची मोठी संधी मिळणार आहे.
1 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा 💰
मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले की या योजनेतून महिलांना ₹10,000 ते ₹1,00,000 पर्यंत कर्ज मिळू शकते. 5 ते 10 महिलांचा गट तयार करून एकत्र व्यवसाय सुरू करण्याची संधीही आहे. सध्या मुंबई बँकेची 16.07 लाख बचत खाती आहेत. त्यापैकी ‘माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत 53,357 महिलांची झिरो बॅलन्स खाती उघडण्यात आली आहेत. पात्र लाभार्थींना शासन दरमहा ₹1500 थेट खात्यात जमा करत आहे.
अंगणवाडी बांधकामात आधुनिक तंत्रज्ञान 🌱
अंगणवाड्यांच्या बांधकामात एकसमान पद्धतीचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. ऊर्जा बचतीसाठी सौरउर्जा प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात, असेही त्या म्हणाल्या. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडींचे महत्त्व लक्षात घेऊन दर्जेदार शिक्षण व आरोग्य सुविधा पुरवण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









