EPFO ने आपल्या सदस्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्या कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांच्या सदस्याचा मृत्यू झाला आहे. EPFO ने आता मृत्यू दाव्याची प्रक्रिया आधीपेक्षा सोपी केली आहे. EPFO च्या नव्या परिपत्रकानुसार, आता मृत सदस्यांच्या अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल. यासाठी पालकत्व प्रमाणपत्राची गरज भासणार नाही.
यापूर्वी, कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) सदस्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबाला PF, पेन्शन किंवा विमा रक्कम काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यांना न्यायालयातून पालकत्व प्रमाणपत्र प्राप्त करावे लागे. या सर्व कागदपत्रांचा सादर करण्यासाठी काही महिने लागत. यामुळे कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे आणि त्यांना अनेक ठिकाणी धावपळ करावी लागे.
नव्या परिपत्रकात काय सांगितले आहे?
EPFO ने 13 ऑगस्ट 2025 रोजी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, “प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांना तात्काळ पैसे मिळवण्यासाठी, जर बॅंक खात्यात पैसे जमा केले जात असतील तर स्वतंत्र पालक प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.” EPFO असे म्हणते की, ते पैसे लवकर मिळावेत आणि मुलांना कोणत्याही त्रासाशिवाय त्यांचे हक्क मिळावेत अशी त्यांची इच्छा आहे.
EPFO क्लेम पैसे कसे काढायचे?
EPFO चे पैसे सहजतेने काढण्यासाठी, सदस्याच्या प्रत्येक मुलाच्या नावाने एक स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल. त्यानंतर, PF आणि विमा रक्कम थेट त्याच खात्यात जमा केली जाईल. एकदा क्लेमची रक्कम या खात्यात जमा झाल्यावर, ती काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
या साठी कोणता फॉर्म?
कर्मचारी भविष्य निधी संघटनेत (EPFO) एक EPF फॉर्म 20 वापरात आहे. हा एक विशेष फॉर्म आहे, जो मयत EPF सदस्याच्या PF खात्यातून पैसे काढण्यासाठी वापरण्यात येतो. हा फॉर्म नामनिर्देशित व्यक्ती, कायदेशीर वारस किंवा मयत सदस्याचा पालक भरू शकतो. हा फॉर्म PF खात्याच्या अंतिम क्लेमसाठी आहे.
या बदलामुळे EPFO सदस्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. मृत सदस्यांच्या कुटुंबांना त्यांच्या आर्थिक हक्कांसाठी धावपळ करावी लागणार नाही आणि लवकर पैसे मिळतील. त्यामुळे EPFO च्या या निर्णयाचे स्वागत करणारे अनेक आहेत.
डिस्क्लेमर: वरील माहिती EPFO च्या नवीन परिपत्रकानुसार आहे. कृपया अधिकृत सूत्रांकडून अधिक माहिती घेऊन योग्य ती पावले उचला.









