Govt. to Sell Minority Stake LIC: देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी LIC पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केंद्र सरकारनं आपला आणखी हिस्सा विकण्याचा विचार सुरू केला असून, या निर्णयामुळे शेअर बाजारात खळबळ उडण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार आणि आर्थिक तज्ज्ञ या घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
एलआयसीमधील हिस्सा विक्रीची शक्यता
LIC मध्ये सध्या केंद्र सरकारचा सुमारे 96.5% हिस्सा आहे. आता सरकार आणखी हिस्सा विकण्याच्या तयारीत असून, निर्गुंतवणूक विभाग यावर काम करत आहे. मे 2022 मध्ये आयपीओद्वारे सरकारनं 3.5% हिस्सा विकला होता. त्या वेळी शेअरचा दर 902 ते 949 रुपयांदरम्यान होता आणि सरकारला सुमारे 21,000 कोटींचा निधी मिळाला होता.
ओएफएस मार्गे शेअर विक्रीवर प्राथमिक चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारनं ऑफर फॉर सेल (OFS) मार्गे LIC मधील उर्वरित हिस्सा विकण्यास मान्यता दिली आहे. ही चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शेअर विक्रीला अंतिम स्वरूप दिलं जाईल. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे 16 मे 2027 पर्यंत LIC मध्ये किमान 10% सार्वजनिक भागभांडवल असणं बंधनकारक आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारला आणखी 6.6% हिस्सा विकावा लागणार आहे.
शेअर विक्री केव्हा होणार?
सध्याच्या घडीला LIC चं एकूण बाजार भांडवल 5.85 लाख कोटी रुपये इतकं आहे. गुरुवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 2.01% घसरून 926.85 रुपयांवर बंद झाला. LIC चा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,221.50 रुपये असून नीचांक 715.35 रुपये आहे. हिस्सा विक्रीची अंतिम रक्कम, किंमत आणि वेळ या संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं.
प्रीमियम उत्पन्नात LIC ची दमदार वाढ
फक्त हिस्सा विक्रीच नाही, तर LIC च्या कामगिरीतही सुधारणा होत असल्याचं दिसतंय. जून 2025 मध्ये LIC चं वैयक्तिक प्रीमियम उत्पन्न 14.60% ने वाढून 5,313 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. याच कालावधीत 25 खाजगी विमा कंपन्यांनी मिळून 8,408 कोटी रुपये उत्पन्न मिळवलं. जीवन विमा परिषदेच्या आकडेवारीनुसार, सर्व कंपन्यांच्या एकूण प्रीमियम उत्पन्नात 12.12% वाढ नोंदवली गेली आहे.
DISCLAIMER:
वरील लेखात दिलेली माहिती विश्वसनीय स्रोतांवर आधारित आहे. गुंतवणुकीपूर्वी वाचकांनी स्वतःचा अभ्यास करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शेअर बाजार गुंतवणुकीत जोखीम असते.