DeepSeek ने AI च्या जगात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. चीनमधील या स्टार्टअपच्या AI मॉडेलने OpenAI च्या ChatGPT ला कडवी टक्कर दिली आहे. युजर्समध्ये हा मॉडेल झपाट्याने लोकप्रिय होत असून मोठ्या प्रमाणावर युजर्स यावर साइन-अप करत आहेत.
मात्र, अलीकडेच DeepSeek वर एक मोठा सायबर हल्ला (Cyber Attack) झाला आहे. या हल्ल्यामुळे सध्या केवळ चीनच्या फोन नंबर (+86) असलेल्या युजर्सना नवीन खाते रजिस्टर करण्याची परवानगी मिळत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर सायबर हल्ल्याची माहिती देणारा मेसेज दिसत आहे.
DeepSeek ने सांगितले की, सेवेला चालू ठेवण्यासाठी सध्या फक्त +86 फोन नंबरसाठी रजिस्ट्रेशनची सुविधा दिली जात आहे. मात्र, आधीपासून असलेले युजर्स त्यांच्या अकाउंटवर पूर्ववत लॉगिन करू शकतात.
DeepSeek च्या यशस्वी प्रगतीमुळे त्याची ChatGPT शी तुलना केली जात आहे. जर तुम्ही या दोन्ही मॉडेल्सबाबत गोंधळलेले असाल आणि कोणते चांगले आहे याबाबत निश्चित करू शकत नसाल, तर आम्ही तुम्हाला मदत करू. या दोन्ही मॉडेल्सच्या वैशिष्ट्यांवर आधारित माहिती खाली दिली आहे, जी तुमच्यासाठी योग्य निवड करण्यात उपयोगी ठरेल.
वैशिष्ट्ये आणि मर्यादा
AI चॅटबॉट्सबाबत बोलायचे झाल्यास, DeepSeek आणि ChatGPT ने स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. मात्र, दोघांची काही ठळक वैशिष्ट्ये आणि मर्यादा आहेत.
DeepSeek
DeepSeek ची सर्वात मोठी ताकद म्हणजे कोड जनरेशन (Code Generation). हे पायथन (Python) आणि जावा (Java) यासारख्या प्रोग्रामिंग भाषांमध्ये काम करणाऱ्या डेव्हलपर्ससाठी उपयुक्त ठरते. तसेच, हे कठीण गणिती समीकरणं सोडवण्यातही प्रवीण आहे, ज्यामुळे टेक्निकल टास्क पूर्ण करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे साधन बनते.
तथापि, DeepSeek ची मर्यादा म्हणजे त्याचे सेंसरशिप प्रोटोकॉल (Censorship Protocols), जे चीनच्या सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. यामुळे, राजकीय विषयांवर माहिती देण्यासाठी याच्यावर जास्त अवलंबून राहता येत नाही.
ChatGPT
दुसरीकडे, ChatGPT हे स्टोरीटेलिंग, विनोद (Humor), आणि मार्केटिंग कॉपी तयार करण्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे. याला दिलेल्या प्रॉम्प्ट्सवरून क्रिएटिव्ह आणि एन्गेजिंग कंटेंट तयार करता येतो. जोक्स सांगणे, गोष्टी रंगवणे आणि वेगवेगळ्या कथानकांना हाताळण्याची यामध्ये प्रचंड क्षमता आहे.
ChatGPT जागतिक घडामोडींशी सतत अपडेट असते आणि ताज्या बातम्यांसंदर्भात विचारल्यास जलद प्रतिसाद देते.
तथापि, याच्या काही मर्यादाही आहेत. ChatGPT नेमक्या उत्तरांमध्ये कुशल असूनही काही वेळा अचूक उत्तर देण्यात अपयशी ठरते.
कोणता बेस्ट?
तुमच्या गरजांवर अवलंबून आहे. जर तुम्हाला कोडिंग, टेक्निकल टास्कसाठी प्रभावी टूल हवे असेल, तर DeepSeek योग्य पर्याय आहे. मात्र, तुम्हाला क्रिएटिव्हिटी, स्टोरीटेलिंग, किंवा मार्केटिंगसाठी AI हवे असल्यास ChatGPT उत्तम आहे.