UPI AutoPay: आजच्या काळात वीज, पाणी, गॅस, इंटरनेट, मोबाईल रिचार्ज, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा अनेक सेवांचे पैसे आपण डिजिटल पद्धतीने भरतो. बिल वेळेवर भरले जावे यासाठी UPI AutoPay ही सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, अनेकदा हीच सुविधा लक्षात न येता दरमहा खात्यातून पैसे कापले जाण्याचे कारण ठरते. त्यामुळे ही सेवा नेमकी काय आहे आणि गरज नसताना ती कशी बंद करायची, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
UPI AutoPay म्हणजे काय?
UPI AutoPay ही अशी सुविधा आहे, ज्यामध्ये एकदा परवानगी दिल्यानंतर ठराविक तारखेला ठरलेली रक्कम आपोआप बँक खात्यातून वजा होते. वीज बिल, मोबाईल पोस्टपेड, इंटरनेट सेवा, ओटीटी सबस्क्रिप्शन किंवा अॅपवर आधारित सेवा यासाठी ही सुविधा वापरली जाते.
कोणत्या सेवांसाठी AutoPay सुरू आहे, कसे तपासाल?
तुम्ही PhonePe, Google Pay किंवा अन्य UPI अॅप वापरत असाल, तर AutoPay कोणत्या सेवांसाठी सुरू आहे हे सहज तपासता येते. अॅपमधील AutoPay किंवा Mandates विभागात सर्व सक्रिय सेवा दिसतात.
PhonePe वर AutoPay बंद करण्याची पद्धत
सर्वप्रथम PhonePe अॅप उघडा. वरच्या डाव्या कोपऱ्यातील प्रोफाइल फोटोवर टॅप करा. Payment Management या विभागात जा. तेथे AutoPay हा पर्याय निवडा. येथे AutoPay सुरू असलेल्या सर्व सेवांची यादी दिसेल. ज्या सेवेसाठी AutoPay बंद करायचा आहे, ती निवडा. तात्पुरते थांबवायचे असल्यास Pause AutoPay निवडा. पूर्णपणे बंद करायचे असल्यास खाली स्क्रोल करून Delete AutoPay वर टॅप करा.
AutoPay नियमितपणे तपासणे का गरजेचे आहे?
आज स्मार्टफोन हा केवळ संवादाचे साधन राहिलेला नाही, तर बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांचे केंद्र बनला आहे. अनेकदा एखादे अॅप इन्स्टॉल करताना आपण परवानग्या देतो आणि नंतर ते अॅप काढून टाकतो. मात्र AutoPay सक्रियच राहतो आणि दरमहा पैसे कापले जात राहतात. त्यामुळे अशा अनावश्यक खर्चापासून बचाव करण्यासाठी AutoPay वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.

