सरकार देशातील बँकिंग क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील अशा मजबूत बँका उभ्या करणे हीच सरकारची भूमिका असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा वेग घेत आहे. या विलिनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर देशातील दुसरी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
कोणत्या दोन बँकांचे होणार विलिनीकरण?
सरकार युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या दोन सरकारी बँकांचे विलिनीकरण करण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही बँकांचे मुख्यालय मुंबईत आहे. या विलिनीकरणानंतर सुमारे 25.5 कोटी ग्राहकांचा एक विशाल बँकिंग समूह तयार होईल, जो ग्राहकसंख्येच्या बाबतीत एसबीआयच्या अगदी जवळ जाणारा असेल.
विलिनीकरणामागील कारणे
युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्या विलिनीकरणाची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. बँकांचा तोटा कमी करणे, थकित कर्जांचे प्रमाण आटोक्यात आणणे, कार्यक्षमता वाढवणे आणि आर्थिकदृष्ट्या बँकांना अधिक बळकट करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. मोठ्या आकाराच्या बँकांमुळे भांडवली ताकद वाढते आणि व्यवस्थापन खर्चावर नियंत्रण ठेवता येते.
विलिनीकरण कधी होणार?
लहान बँकांची संख्या कमी करून मोठ्या आणि सक्षम बँका उभारण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे भारतीय बँकांना जागतिक बँकांशी स्पर्धा करता येईल. युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावावर सध्या सरकारकडून वेगाने काम सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, विलिनीकरणाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
यापूर्वीही झाले आहेत बँकांचे विलिनीकरण
देशात याआधीही बँकांचे विलिनीकरण झाले आहे. 2017 ते 2020 या कालावधीत सरकारने 10 सरकारी बँकांचे विलिनीकरण करून 4 मोठ्या बँका तयार केल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 सहयोगी बँकांचा समावेश करण्यात आला. या प्रक्रियेमुळे सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 इतकी कमी झाली.
विलिनीकरणाचे फायदे काय?
लहान बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण झाल्यास प्रशासनाचा खर्च कमी होतो. बँकिंग सेवा अधिक कार्यक्षम बनतात. मोठ्या बँकांमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळतो, ज्याचा फायदा ग्राहकांनाही होतो. स्पर्धा वाढल्याने सेवा सुधारतात आणि दीर्घकालीन स्थैर्य मिळते.
ग्राहकांवर काय परिणाम होईल?
युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्या विलिनीकरणाचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. ग्राहकांना सुधारित सेवा आणि अधिक मजबूत बँकिंग प्रणालीचा लाभ मिळेल. मात्र, काही प्रशासकीय बदलांचा सामना करावा लागू शकतो. शाखांचे नाव, पत्ता, आयएफएससी कोड बदलू शकतात. पासबुक, चेकबुक यासंबंधी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागू शकतात. मात्र, ग्राहकांच्या ठेवी, बचत खाते, मुदत ठेवीवरील व्याजदर तसेच गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या अटींवर कोणताही परिणाम होणार नाही.

