देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांवरील शुल्क वाढवले असून, त्यामुळे आता एटीएममधून पैसे काढणे आणि इतर व्यवहार अधिक महाग होणार आहेत. इंटरचेंज शुल्कात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. याआधीही फेब्रुवारी 2025 मध्ये एटीएम शुल्कात वाढ करण्यात आली होती.
1 डिसेंबर 2025 पासून नवे शुल्क लागू
स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले की सुधारित शुल्क 1 डिसेंबर 2025 पासून लागू झाले आहे. या बदलाचा परिणाम इतर बँकांचे एटीएम वापरणाऱ्या सेव्हिंग आणि सॅलरी खातेधारकांवर होणार आहे. मात्र, काही ठरावीक खात्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही. दरमहा मिळणाऱ्या मोफत व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
एटीएम व्यवहारांसाठी शुल्क किती वाढले?
एसबीआयच्या सेव्हिंग खातेदारांना इतर बँकांच्या एटीएममधून दरमहा 5 आर्थिक आणि 5 गैरआर्थिक व्यवहार मोफत करता येतील. ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक रोख पैसे काढण्याच्या व्यवहारासाठी आता 21 रुपयांऐवजी 23 रुपये शुल्क आकारले जाईल. यावर जीएसटी वेगळा लागेल. तसेच, गैरआर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारावर 10 रुपयांऐवजी 11 रुपये शुल्क आणि त्यावर जीएसटी भरावा लागेल.
एसबीआयच्या एटीएमवरही मर्यादा निश्चित
आतापर्यंत एसबीआयच्या स्वतःच्या एटीएमवर अमर्यादित मोफत व्यवहार करता येत होते. मात्र, आता दरमहा केवळ 10 मोफत आर्थिक आणि गैरआर्थिक व्यवहारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक रोख व्यवहारासाठी 23 रुपये आणि गैरआर्थिक व्यवहारासाठी 11 रुपये शुल्क, त्यासोबत जीएसटी आकारले जाईल. मात्र, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांच्या विद्यमान सेवा शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
कोणत्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही?
एसबीआयच्या एटीएमवर एसबीआय डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी विद्यमान सेवा शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच, कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा पुढील सूचनेपर्यंत पूर्णपणे मोफत राहणार आहे.

