RBI Announcement Fact Check: भारतात अनेक लोकांकडे दोन किंवा त्याहून अधिक बँक खाती आहेत. अशा परिस्थितीत ही बातमी, की दोन बँक खाती असल्यास दंड भरावा लागेल, लोकांना चिंताग्रस्त करू शकते. विशेषतः त्यांना, जे खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करतात. कारण, खासगी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांकडे नेहमीच एकापेक्षा जास्त बँक खाती असतात.
याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा एखादा कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जातो, तेव्हा नवीन कंपनी त्याच्यासाठी आपल्या टायअप असलेल्या बँकेत वेगळे पगार खाते उघडते. अशा प्रकारे, काही लोकांकडे दोन नव्हे तर तीन-चार किंवा पाच बँक खातीही उघडले जातात. चला, आता या दाव्याचे सत्य नेमके काय आहे हे समजून घेऊया.
आधी जाणून घ्या, दावा काय आहे?
अलीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जर तुमच्याकडे दोन किंवा त्याहून अधिक बँक खाती असतील तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या दाव्यात आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा उल्लेख करून सांगितले आहे की, आरबीआयने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्याअंतर्गत दोन बँक खाती असल्यास कठोर दंड लादला जाईल.
या दाव्याचे सत्य काय?
या दाव्यावर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) फॅक्ट चेक केले आहे. रविवारी PIB ने हा दावा फेक असल्याचे जाहीर केले. PIB ने म्हटले की, काही लेख आणि पोस्ट्स अशा चुकीच्या बातम्या पसरवत आहेत की, दोन बँक खाती असल्यास दंड भरावा लागेल. मात्र, आरबीआयने यासंदर्भात कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. त्यामुळे हा दावा पूर्णपणे खोटा आहे. PIB ने लोकांना अशा अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
एक व्यक्ती किती बँक खाती ठेवू शकतो?
भारतात एका व्यक्तीने किती बँक खाती ठेवावीत याबाबत कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. म्हणजेच, कोणत्याही व्यक्तीला आपल्या गरजेनुसार कितीही बँक खाती उघडता येतात. आरबीआयने यासाठी कोणताही नियम किंवा मर्यादा घालून दिलेली नाही.
मात्र, जितकी जास्त खाती उघडाल तितकी त्यांची जबाबदारी तुमच्यावर येते. प्रत्येक खात्यात ठरावीक रक्कम ठेवणे आवश्यक असते. जर तुम्ही हे केले नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होऊ शकतो, जो तुमच्या क्रेडिट क्षमतेसाठी महत्त्वाचा आहे.