एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या असून, विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ सहभागी होतं. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील हे देखील उपस्थित होते. राज्यभराचे लक्ष होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? अखेर एकनाथ शिंदे यांनी या चर्चेतून मोठं यश मिळवलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 5,000 रुपयांच्या वेतनवाढीची मागणी केली होती, परंतु सरकारने 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मी मनापासून आभार मानतो. आमची मागणी होती की महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार वेतन मिळावे. त्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीने साडेपाच हजार रुपयांची वाढ करण्याची सूचना केली होती. आमची मागणी 5,000 रुपये वेतन वाढवण्याची होती, आणि सरकारने ती मागणी मान्य केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 रुपयांची वाढ मिळाली होती, त्यांना आता सरसकट 6,500 रुपयांची वेतनात वाढ देण्यात आली आहे,” अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.
नेमकी पगारवाढ कशी झाली? “ज्यांना 2021 मध्ये 5,000 रुपयांची वाढ मिळाली होती, त्यांच्या पगारात आता 1,500 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच ज्यांना 4,000 रुपयांची वाढ मिळाली होती, त्यांच्या पगारात 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्यांना 2,500 रुपयांची वाढ मिळाली होती, त्यांच्या पगारात 4,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मी या निमित्ताने राज्य सरकारचा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो,” अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली. तसेच त्यांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना उद्या सकाळी 7 वाजेपासून कामावर जाण्याचे आवाहन केले.
सरकार ‘त्या’ कर्मचाऱ्यांवरील केस मागे घेणार कामगार नेते किरण पावसकर यांनीदेखील या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानावे लागतील. गोपीचंद पडळकर यांनी संपाबाबत आधीच सूचना दिली होती. ज्या मागण्यांसाठी आम्ही गेलो होतो, त्या सर्व मान्य करण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी गेल्या 6 महिन्यांपासून घरी बसले आहेत, त्यांच्या छोट्या केसेस, जसे की 100 किंवा 50 रुपयांच्या, त्यांच्यावरची कारवाई संपवून त्यांना कामावर घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. 2020 पासून 2024 पर्यंतच्या थकबाकीची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही पहिलीच वेळ आहे की सर्व 23 संघटनांचे कर्मचारी एकत्र आले आहेत आणि सर्वजण आनंदी आहेत. मी पुन्हा एकदा सरकारचा आभारी आहे,” अशी प्रतिक्रिया किरण पावसकर यांनी दिली.
“यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 250 डेपो आहेत, त्यापैकी काही डेपो रिपेअर करायचे आहेत, कर्मचाऱ्यांच्या रेस्ट रूम्स देखील रिपेअर केल्या जातील, असं सरकारने सांगितलं आहे,” अशी माहिती पावसकर यांनी दिली.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावे, महागाई भत्ता मिळावा, घरभाडे भत्ता मिळावा, आणि एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5,000 रुपयांची वेतनवाढ मिळावी, अशा मागण्या आंदोलकांच्या प्रमुख होत्या.