गेल्या वर्षी August 2024 मध्ये मोठ्या धडाक्यात सुरू झालेली लाडकी बहीण योजना आता नव्या टप्प्यात पोहोचली आहे. सुरुवातीला व्यापक अंमलबजावणी झाल्यानंतरही अनेक गैरप्रकार समोर आले. काही पुरुषांनी योजनेत घुसखोरी केली तर काही शासकीय महिला अधिकाऱ्यांनीही लाभ घेतल्याची प्रकरणे उघड झाली. त्यामुळे सरकारने या योजनेत निकष अधिक कडक करत ई-केवायसी (Ladki Bahin Yojana eKYC) प्रक्रिया बंधनकारक केली आहे. या निर्णयामुळे काही पात्र लाभार्थ्यांनाही अतिरिक्त कागदोपत्र तयार करावे लागणार आहे.
सरकारची नवी पावले
महायुती सरकारच्या या योजनेला मिळालेला मोठा प्रतिसाद लक्षात घेता प्रशासन आता फसवणूक रोखण्यासाठी अलर्ट मोडवर आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी ई-केवायसी करणे आता अनिवार्य आहे. हे पाऊल घेण्यामागे पारदर्शकता राखणे आणि खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंतच योजना पोहोचवणे हा उद्देश आहे.
दोन महिन्यांची मुदत
सध्या सणासुदीचा काळ लक्षात घेऊन सरकारने महिलांना ई-केवायसीसाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. मात्र, उशीर न करता ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास योजनेचा हप्ता थांबण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी कराल
• महिलांनी स्वतः ऑनलाईन किंवा जवळच्या सीएससी (CSC) सेंटरवर जाऊन e-KYC करू शकतात
• ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करावी
• नाव, पत्ता, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचे तपशील अशी आवश्यक माहिती अपलोड करणे गरजेचे आहे
• संकेतस्थळावर लवकरच ई-केवायसीसाठी पॉपअप विंडो सुरू होईल, त्यानुसार नोंदणी करता येईल
ही संपूर्ण प्रक्रिया सोपी असून वेळेत पूर्ण न केल्यास संकेतस्थळावर मोठी गर्दी आणि तांत्रिक अडचणी येऊ शकतात. पुढील मनस्ताप टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी करून घ्या.









