एचडीएफसी बँकेकडून कर्ज (Loan) घेणे आता अधिक महाग होणार आहे. भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स (MCLR) मध्ये बदल केले आहेत. बँकेने 3 महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR वाढवला आहे. ही वाढ 5 आधार अंक म्हणजेच 0.05 टक्के करण्यात आली आहे.
एचडीएफसी बँकेची MCLR आता 9.10% ते 9.45% दरम्यान आहे. नवीन दर शनिवारीपासून लागू झाले आहेत. इतर कालावधींवरील MCLR दर मात्र पूर्वीप्रमाणेच ठेवले आहेत. बँकेची ओव्हरनाईट MCLR 9.10% असून, 1 महिन्याची MCLR 9.15% आहे.
गेल्या महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील MCLR मध्ये 0.10% वाढ केली होती. या वाढीनंतर एसबीआयच्या MCLR आधारित व्याजदर (Interest Rates) 8.20% ते 9.1% दरम्यान आहेत. त्याचवेळी, बँकेने ओव्हरनाईट MCLR देखील 8.20% पर्यंत वाढवली होती.
3 महिन्यांची MCLR किती वाढली? एचडीएफसी बँकेची 3 महिन्यांची MCLR 9.25% वरून 9.30% झाली आहे. तसेच, बँकेची 6 महिन्यांची MCLR 9.40% आहे. याशिवाय, सर्व दीर्घकालीन कर्जांसाठी (Loans) MCLR दर 9.45% आहे. MCLR हे बँकांना गृहकर्ज (Home Loan), व्यवसाय कर्ज (Business Loan) आणि वैयक्तिक कर्जांसारख्या (Personal Loan) विविध कर्जांवरील व्याजदर ठरवण्याचे साधन आहे.
MCLR म्हणजे काय? MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स (Marginal Cost of Lending Rates), ही बँकेची कर्ज देण्यासाठीची किमान व्याजदर (Minimum Interest Rate) आहे. बँकेला यापेक्षा कमी दराने कर्ज देण्याची परवानगी नाही.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India – RBI) 1 एप्रिल 2016 रोजी कर्जाच्या व्याजदरांसाठी MCLR लागू केले. MCLR मध्ये वाढ किंवा घट झाल्याने कर्ज (Loan) घेणाऱ्यांवर थेट परिणाम होतो, आणि दरवाढ झाल्यास कर्जदारांना जास्त EMI भरावा लागतो.