Atal Pension Yojana: अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सरकार अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवून 10,000 रुपये प्रति महिना करू शकते. सध्या लोकांना जास्तीत जास्त 5000 रुपये पेन्शन मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार अटल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. बजेटमध्ये अटल पेन्शन योजनेंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अटल पेन्शन योजनेत 5,000 नव्हे, 10,000 रुपये मिळणार पेन्शन
एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, किमान पेन्शन हमी 10,000 रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे आणि याला जवळपास मान्यता मिळाली आहे. बजेटमध्ये याबद्दल घोषणा होऊ शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, किमान पेन्शनची रक्कमही वाढवली जाऊ शकते. ही योजना देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 60 वर्षांनंतर आर्थिक मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
अटल पेन्शन योजना काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी ही योजना सुरू केली होती. अटल पेन्शन योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना असून तिचा उद्देश वृद्ध व्यक्तींना, विशेषतः गरीब आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. या योजनेचे नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर ठेवले गेले. सध्या, या योजनेत गुंतवणूक केल्यास 60 वर्षांनंतर 1,000 रुपये ते 5,000 रुपये पर्यंत पेन्शन मिळते.
7 कोटी लोक अटल पेन्शन योजनेशी जोडले गेले
ऑक्टोबर 2024 च्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अटल पेन्शन योजनेत 7 कोटींपेक्षा जास्त ग्रॉस नोंदणी झाली होती. या कालावधीत 56 लाख नवीन सबस्क्रायबर्स या योजनेत सामील झाले. आतापर्यंत 7 कोटी लोक या योजनेसह जोडले गेले आहेत. या योजनेला प्रोत्साहन देण्यात पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
अटल पेन्शन योजनेचे फायदे
या योजनेत लाभार्थ्यांना 60 वर्षांच्या वयानंतर दरमहा ₹1,000, ₹2,000, ₹3,000, ₹4,000 किंवा ₹5,000 पर्यंतची किमान हमी असलेली पेन्शन मिळते. पेन्शनची रक्कम तुमच्या योगदानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 18 व्या वर्षी ₹1,000 मासिक पेन्शनसाठी गुंतवणूक सुरू केली तर त्याला फक्त ₹42 मासिक योगदान द्यावे लागेल. तर, 40 व्या वर्षी ₹5,000 मासिक पेन्शनसाठी जास्तीत जास्त ₹1,454 मासिक योगदान द्यावे लागेल. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात ‘संपूर्ण सुरक्षा कवच’ उपलब्ध आहे. जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या जीवनसाथीला तीच पेन्शन मिळते. जीवनसाथीनंतर नामांकित व्यक्तीला 60 वर्षांपर्यंत जमा केलेली सर्व रक्कम परत मिळते.
अर्हता
- ही योजना 18 ते 40 वर्षे वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.
- अर्जदाराकडे बँक खाते असणे गरजेचे आहे.
- इनकम टॅक्स भरणारे लोक या योजनेसाठी पात्र नाहीत.
- पेन्शन रकमेच्या आधारावर योगदानाची रक्कम वेगवेगळी असते.
अर्ज कसा करायचा?
ऑफलाइन पद्धत
- तुमच्या बँकेत जा, जिथे तुमचे सेव्हिंग अकाउंट आहे.
- बँकेतून नोंदणी फॉर्म घ्या किंवा त्यांची वेबसाइटवरून डाउनलोड करा.
- फॉर्ममध्ये अचूक माहिती भरा आणि पेन्शन पर्याय निवडा.
- फॉर्मसह आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करा.
- अर्ज स्वीकारल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मेसेज येईल.
ऑनलाइन प्रक्रिया
- तुमच्या बँक पोर्टल किंवा मोबाईल बँकिंग अॅपवर जा.
- लॉगिन आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करा.
- ‘Social Security Scheme’ किंवा ‘Atal Pension Yojana’ सर्च करा.
- अर्ज फॉर्म भरा आणि सर्व आवश्यक माहिती द्या.
- मासिक योगदानासाठी ऑटो-डेबिटची संमती द्या.
- फॉर्म सबमिट करण्यापूर्वी माहिती पडताळून बघा आणि नंतर सबमिट करा.