केंद्र सरकारच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFO ने डिसेंबर 2025 मध्ये एक महत्त्वाचा बदल लागू केला आहे. या बदलामुळे नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. Employees’ Deposit Linked Insurance Scheme म्हणजेच EDLI अंतर्गत मृत्यू दावा (death claim) अडखळण्याची अनेक कारणे आता दूर होणार आहेत.
नोकरी बदलताना सुट्टीचा ब्रेक धरला जाणार नाही
EPFO ने स्पष्ट केले आहे की एखादा कर्मचारी एका कंपनीतून बाहेर पडून दुसऱ्या कंपनीत रुजू होत असेल आणि मधल्या काळात फक्त शनिवार, रविवार किंवा अधिकृत सुट्टी येत असेल, तर तो कालावधी सेवा खंडित मानला जाणार नाही. याआधी अनेक प्रकरणांमध्ये केवळ वीकएंडमुळे सेवा तुटली असे मानले जात होते आणि त्यामुळे कुटुंबांना EDLI चा लाभ नाकारला जात होता.
कोणत्या सुट्ट्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत
नव्या नियमांनुसार दोन नोकऱ्यांमधील कालावधीत येणाऱ्या राष्ट्रीय सुट्ट्या, गॅझेटेड सुट्ट्या, राज्यस्तरीय सुट्ट्या आणि प्रतिबंधित सुट्ट्यांमुळे सेवा खंडित झाल्याचे मानले जाणार नाही. जुन्या कंपनीतून बाहेर पडल्यानंतर आणि नव्या कंपनीत रुजू होण्यामधील कालावधी फक्त अशाच सुट्ट्यांचा असल्यास तो सातत्यपूर्ण सेवा म्हणूनच ग्राह्य धरला जाईल.
60 दिवसांपर्यंतचा कालावधीही मान्य
EPFO ने आणखी एक महत्त्वाचा बदल करत सांगितले आहे की एखादा कर्मचारी EPF अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असेल आणि नोकऱ्यांमधील अंतर 60 दिवसांपर्यंत असेल, तरीही ती सलग सेवा मानली जाईल. त्यामुळे किरकोळ आणि अपरिहार्य खंडामुळे कुटुंबाचा विमा हक्क हिरावला जाणार नाही.
किमान EDLI रक्कम ₹50,000
EDLI योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम वाढवून ₹50,000 करण्यात आली आहे. कर्मचारी 12 महिने सलग सेवेत नसला तरीही नामनिर्देशित व्यक्तीला किमान ₹50,000 मिळणार आहेत. तसेच कर्मचाऱ्याचा सरासरी PF शिल्लक ₹50,000 पेक्षा कमी असली तरीही ही किमान रक्कम दिली जाईल. कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.
6 महिन्यांच्या अटीतही सवलत
नव्या परिपत्रकानुसार, कर्मचाऱ्याचा शेवटचा PF हप्ता भरल्यानंतर 6 महिन्यांच्या आत मृत्यू झाल्यास आणि कर्मचारी अधिकृतपणे नोकरीत असल्यास, EDLI अंतर्गत किमान लाभ देण्यात येणार आहे. याआधी अशा प्रकरणांमध्ये अनेकदा दावा प्रक्रियेत अडथळे येत होते.
कुटुंबांसाठी मोठा दिलासा
EPFO च्या या निर्णयामुळे नोकरी बदलताना होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होणार असून मृत्यू दावा प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. विशेषतः वीकएंड, सुट्ट्या किंवा छोट्या कालावधीच्या ब्रेकमुळे कुटुंबाला विमा लाभ नाकारला जाणार नाही, हे या परिपत्रकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मानले जात आहे.

