8th Pay Commission Impact: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा फायदा फक्त पगारवाढीतच होणार नाही, तर भारतीय शेअर बाजारावरही त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनने आपल्या ताज्या रिपोर्ट मध्ये दिली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, वेतन आयोगामुळे वाढणारा उपभोग (कंझम्प्शन) कंपन्यांच्या कमाईला चालना देणार असून त्यामुळे शेअर बाजारात तेजी दिसू शकते.
उपभोग वाढला की कंपन्यांची कमाई वाढते
जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, पगारात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा खर्च वाढतो. याचा थेट फायदा भारतीय कंपन्यांच्या उत्पन्नावर होतो. कंपन्यांची कमाई वाढू लागली की परदेशी गुंतवणूकदारांचे आकर्षणही परत वाढण्याची शक्यता आहे. सध्या परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे, कारण अनेक भारतीय कंपन्यांची कमाई वाढ मंदावलेली दिसत होती.
आयोगाच्या शिफारसी पूर्वलक्षी प्रभावाने लागू
पूर्व न्यायमूर्ती रंजन देसाई यांच्या अध्यक्षतेखालील आठवा वेतन आयोगाने काम सुरू केले असून १८ महिन्यांत अहवाल सादर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेईल. विशेष बाब म्हणजे या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मागील कालावधीचे एरिअर्स देखील मिळतील.
सहाव्या वेतन आयोगाचा उपभोगावर मोठा परिणाम
जेपी मॉर्गनने यापूर्वीचे उदाहरण देताना सांगितले की, २००८ मध्ये सहाव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार तब्बल ४०% ने वाढला होता. शिवाय, एरिअर्समुळे कर्मचारीवर्गाकडे मोठी रक्कम आली होती. परिणामस्वरूप कार, घरे आणि इतर वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती. मात्र सातव्या आयोगात ही वाढ २३-२५% इतकी मर्यादित राहिली होती.
३५ लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी
देशातील केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३५ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे वेतन आयोगामुळे होणारी वाढ देशभरातील उपभोगावर थेट परिणाम करते. विशेषत:, एरिअर्सच्या स्वरूपात मिळणारी रक्कम वाहन आणि घरांच्या विक्रीत चांगली वाढ घडवते.
शेअर बाजार पुन्हा सर्वकालीन उच्चांकाजवळ
२८ नोव्हेंबरला शेअर बाजाराची सुरुवात जोरदार झाली होती. मात्र दिवसाच्या पुढील सत्रात विक्रीचा दबाव वाढला. दुपारी २:३० वाजता निफ्टी ०.०४% घसरून २६,२०५ पातळीवर होता. २७ नोव्हेंबर रोजी निफ्टीने २६,२७७ या आपल्या आधीच्या सर्वकालीन उच्चांकावर मात केली होती, पण नफा वसुलीमुळे तो त्या पातळीखाली बंद झाला.

