प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवल्या. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. काळानुसार या योजनेत अनेक बदल झाले असून आजही देशातील मोठा वर्ग या सुविधेचा लाभ घेत आहे.
जनधन खात्याची मुख्य वैशिष्ट्ये
जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात येणारे बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट (BSBDA) हे सर्वाधिक लोकप्रिय ठरते. या खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याची कोणतीही सक्ती नाही. खातेदारांना महिन्यात चार वेळा मोफत व्यवहार करण्याची परवानगी मिळते. या सुविधा बँक शाखा, एटीएम किंवा नियुक्त केलेल्या बँकिंग सेवा प्रतिनिधी (बँक मित्र) यांच्या माध्यमातून उपलब्ध होतात.
या खात्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे शून्य शिल्लक असतानाही मिळणारी 10 हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा. गरज भासल्यास खात्यात पैसा नसतानाही ही रक्कम काढता येते. यासोबतच दिले जाणारे रुपे डेबिट कार्ड 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण देते.
ग्रामीण आणि दूरभागातील खातेदारांसाठी मोठी सोय
देशातील दुर्गम गावांत बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी बँका ‘बँक मित्र’ किंवा बिझनेस करस्पॉन्डंटची नेमणूक करतात. हे प्रतिनिधी जमा-उचल, शिल्लक तपासणी, मिनी स्टेटमेंट यांसारख्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देतात. ज्याठिकाणी बँक शाखा नव्हत्या, त्या लाखो नागरिकांपर्यंत या सेवांमुळे प्रत्यक्ष बँकिंग पोहोचले.
सरकारी योजनांचा थेट लाभ
जनधन खाते उघडल्याने लाभार्थी आपोआप अनेक महत्त्वाच्या सरकारी योजनांसाठी पात्र ठरतात. यात प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT), प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि मुद्रा कर्ज योजना आदींचा समावेश आहे.

