आजच्या काळात घरकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड वापरताना हप्ते म्हणजे EMI सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. ठरलेल्या तारखेला हा हप्ता सरळ बँक खात्यातून वळता केला जातो. मात्र एखाद्या महिन्यात अचानक पैसे कमी पडले आणि EMI भरता आली नाही, तर त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, पर्सनल लोन किंवा इतर कोणत्याही कर्जाची एक EMI जरी चुकली, तरी ती गोष्ट साधी नाही. बँका आणि क्रेडिट ब्युरो याला तुमच्या आर्थिक शिस्तीवर नकारात्मक परिणाम करणारी बाब मानतात. छोटीशी चूकही तुमचा क्रेडिट स्कोर 50 ते 100 पॉईंटने खाली आणू शकते. भविष्यात कर्ज घेणे, क्रेडिट कार्ड मिळवणे यामध्ये अडचणी येऊ शकतात.
EMI चुकल्यास काय होते? EMI वेळेवर न भरणे म्हणजे कर्ज सांभाळण्यात अडचण येत असल्याचे संकेत. अशा वेळी बँका 1% ते 2% पर्यंत उशीर शुल्क आकारू शकतात आणि तुमच्या नोंदीत ‘थकबाकीदार’ असा उल्लेख करतात. एखादे कर्ज 90 दिवसांपेक्षा जास्त काळ थकले, तर बँक ते खाते नॉन-परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणून घोषित करते. त्यामुळे ग्राहक ‘हाय-रिस्क’ गटात जातो आणि त्याला रिकव्हरी कॉल्स, नोटिसा किंवा पुढील कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागू शकते.
क्रेडिट स्कोर (CIBIL, Experian, Equifax इ.) प्रामुख्याने तुमच्या पेमेंट हिस्ट्रीवर आधारित असतो. एकदा स्कोर खाली गेल्यानंतर तो परत सुधारण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. याशिवाय, चुकीची नोंद अनेक वर्षे रिपोर्टमध्ये राहते आणि भविष्यातील कर्जक्षमतेवर परिणाम करते.
क्रेडिट स्कोर खराब होऊ नये यासाठी काय करावे? जर चुकून EMI राहिलीच आणि स्कोर खाली आला, तरी काळजी करण्याची गरज नाही. शिस्त आणि योग्य पावले उचलल्यास स्कोर सुधारता येतो.
- उर्वरित रक्कम त्वरित भरा – उशीर झालेली EMI, शुल्क किंवा बाकी रक्कम जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर भरा. यामुळे बँकेला तुमची जबाबदारी जाणवते.
- पेमेंट ऑटोमेट करा – भविष्यात पुन्हा उशीर होऊ नये म्हणून ऑटो-डेबिट किंवा ECS सुविधा सुरू करा. यामुळे EMI आपोआप कट होईल.
- नवीन कर्जासाठी घाई करू नका – स्कोर नुकताच खाली आला असेल, तर लगेच नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे टाळा. वारंवार अर्ज केल्याने स्कोर आणखी खाली जातो.
- रिपोर्ट तपासत राहा – दर तीन-चार महिन्यांनी क्रेडिट रिपोर्ट मोफत तपासा. चुकीची नोंद आहे का किंवा स्कोर सुधारतोय का, हे समजते.
- नियमित शिस्त ठेवा – पुढील 6 ते 12 महिने EMI आणि इतर सर्व बिल वेळेवर भरा. सतत वेळेवर पेमेंट केल्याने स्कोर हळूहळू वाढतो आणि पुन्हा 750+ या चांगल्या श्रेणीत परत येऊ शकतो.

