Ladki Bahin Yojana E-KYC: महिला लाभार्थींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दरमहा आर्थिक लाभ वेळेवर मिळावा यासाठी राज्य सरकारने e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. पण अनेक महिलांना या प्रक्रियेत OTP न येणे किंवा उशिरा येणे यासारख्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी समस्या सोडवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत.
योजनेची पार्श्वभूमी
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) सुरू केली होती. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत होते. मागील वर्षी निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयामागे या योजनेचा मोठा वाटा मानला जातो. मात्र निवडणुकीनंतर काही अनियमितता समोर आल्याने सरकारने पारदर्शकता राखण्यासाठी e-KYC प्रक्रिया सक्तीची केली.
OTP येत नसेल तर काय कराल
e-KYC करताना सर्वाधिक तक्रार OTP न येण्याची किंवा उशिरा येण्याची आहे. अशा वेळी सर्वप्रथम इंटरनेट कनेक्टिव्हिटी नीट आहे का हे तपासा. कमकुवत नेटवर्कमुळे अनेकदा OTP उशिरा मिळतो.
अर्जाची स्थिती तपासा
जर योजनेचा हप्ता मिळत नसेल, तर अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का हे पाहा. मंजुरी न झाल्यास OTP प्रक्रियाही थांबू शकते.
बँक खात्याची खात्री करा
तुमचे बँक खाते आधारशी योग्यरित्या जोडलेले आहे का, तसेच आधारवरील नाव व तपशील बरोबर आहेत का हे तपासणे महत्त्वाचे आहे. चुकीचे तपशील असल्यास OTP किंवा हप्ता मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
प्रशासनाशी त्वरित संपर्क
वरील सर्व उपाय करूनही समस्या कायम राहिल्यास आपल्या जिल्हा प्रशासनाच्या महिला व बालविकास विभागाशी लगेच संपर्क साधा.
e-KYC करण्याची अधिकृत पद्धत
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार e-KYC प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
‘e-KYC’ बॅनरवर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
‘Send OTP’ वर क्लिक केल्यावर आधारशी जोडलेल्या मोबाइलवर OTP येईल.
प्राप्त झालेला OTP टाकून ‘Submit’ करा.
सरकारी सूचनांनुसार e-KYC पूर्ण केल्यास महिलांना योजनेचा आर्थिक लाभ वेळेत मिळू शकतो.









