SIP Best Date: सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. ठरावीक दिवशी नियमित रक्कम गुंतवण्याची ही पद्धत असून मार्केटच्या चढ-उतारात कोणत्या दिवशी गुंतवणूक करावी, याबाबत अनेकांना संभ्रम असतो. कारण कमी एनएव्ही (Net Asset Value) असलेल्या दिवशी युनिट खरेदी केल्यास जास्त युनिट मिळतात आणि दीर्घकाळात जास्त परतावा मिळण्याची शक्यता वाढते.
SIP साठी कोणती तारीख बेस्ट मानली जाते?
अनेक स्टडींनुसार SIP करण्यासाठी महिन्यातील 1, 10 किंवा 25 तारखेला गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात मिळणाऱ्या परताव्यात फारसा फरक पडत नाही. वर्षभरात जास्तीत जास्त 0.2% ते 0.3% एवढाच फरक दिसून येतो. उदाहरणार्थ, दरमहा ₹10,000 SIP मध्ये 12% वार्षिक दराने 20 वर्ष गुंतवणूक केल्यास जवळपास ₹98 लाख पेक्षा अधिक रक्कम तयार होते. याच गुंतवणुकीवर 0.2% जास्त परतावा मिळाल्यास फक्त काही हजार रुपयांचाच अतिरिक्त फायदा होतो.
तारीख ठरवण्यावर जास्त ताण का नको?
दीर्घकालीन गुंतवणुकीत नेमकी कोणती तारीख निवडली याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र अल्पकालात थोडाफार फरक दिसू शकतो. तरीदेखील आर्थिक सल्लागारांचे मत आहे की पगार मिळण्याच्या वेळेनुसार 1, 5 किंवा 7 तारखेला SIP सुरू करणे योग्य ठरते. यामुळे हप्ते चुकण्याची शक्यता कमी होते. काही तज्ज्ञ तर SIP रक्कम महिन्यात वेगवेगळ्या दिवशी विभागून गुंतवण्याचा सल्ला देतात. उदा. दरमहा ₹9,000 गुंतवायचे असल्यास 5 तारखेला ₹3,000, 15 तारखेला ₹3,000 आणि 25 तारखेला ₹3,000 गुंतवता येईल. यामुळे वेगवेगळ्या दिवसांच्या एनएव्हीचा फायदा घेता येतो आणि अल्पकालीन अस्थिरतेचा धोका कमी होतो.
जास्त परतावा मिळवण्यासाठी काय करावे?
SIP मध्ये दीर्घकालीन सातत्य अधिक महत्त्वाचे आहे. जितका जास्त काळ गुंतवणूक सुरू राहील, तितका परतावा वाढतो. मार्केट खाली गेल्यावर घाबरून SIP थांबवणे टाळा. योग्य फंड निवडा, लवकर गुंतवणूक सुरू करा आणि गुंतवणुकीत शिस्त ठेवा, हेच जास्त परताव्याचे खरे रहस्य आहे.
डिस्क्लेमर: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमीच आपला आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. मार्केटमध्ये गुंतवणुकीस धोका असतो.









