मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा १२ वा हप्ता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती शेअर करत महिला लाभार्थींना दिलासा दिला आहे.
हप्ता कधी जमा होणार? पात्र महिलांसाठी मोठी घोषणा
लाखो महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया रक्षाबंधनाच्या आधी सुरू झाल्याचे तटकरे यांनी सांगितले. योजनेअंतर्गत जून महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये ८ ऑगस्टपासून जमा होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या आधी दोन महिन्यांचे हप्ते एकत्र दिले गेले होते, मात्र यंदा केवळ एकच हप्ता दिला जाणार आहे.
बोगस लाभार्थ्यांवर सरकारचा ‘डिजिटल’ डोळा
या योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून संशयित लाभार्थ्यांची यादी सरकारकडे देण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत या डेटाची तपासणी करण्यात येणार असून, बोगस लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार असल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. पुरुष किंवा अपात्र व्यक्ती लाभ घेत असल्याचे आढळल्यास त्यांना माफ केले जाणार नाही.
आदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट काय सांगते?
आदिती तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत स्पष्ट केलं की – “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.” त्यांनी पुढे म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे.
१२ वा हप्ता म्हणजे काय?
जुलै २०२४ मध्ये सुरू झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा हा १२ वा महिना असून, तोच हप्ता आता जमा होणार आहे. ही योजना सुरू झाल्यापासून दर महिन्याला १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या थोडाफार आधार मिळतोय, असं सरकारचं म्हणणं आहे.
🔔 महत्त्वाचं: हप्ता प्राप्त करण्यासाठी आधार लिंक असलेलं बँक खाते असणे गरजेचे आहे. तुमचं पात्रता स्थिती तपासण्यासाठी mahilakalyan.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
📌 Tag: लाडकी बहीण योजना हप्ता, Aditi Tatkare News, Raksha Bandhan 2025, मुख्यमंत्री योजना महिला









