केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) सदस्यांसाठी सेवा अधिक सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने 15 नव्या बँकांसोबत करार करण्यात आला आहे. यापूर्वी केवळ 17 बँकांद्वारे ईपीएफओची सेवा उपलब्ध होती, मात्र आता एकूण 32 बँका या सेवेसाठी उपलब्ध असतील. यामुळे देशभरातील कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत.
सामाजिक सुरक्षिततेला नवी दिशा
मांडविया यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे, आणि सामाजिक सुरक्षा योजनांना अधिक बळ दिले जात आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) अहवालानुसार, दहा वर्षांपूर्वी केवळ 24% लोकसंख्येला सोशल सिक्युरिटी कव्हर मिळत होते, परंतु आता हे प्रमाण 48% वर पोहोचले आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे अधिकाधिक नागरिक या योजनांचा लाभ घेऊ शकत आहेत.
EPFO सदस्य आणि पेंशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी
सध्या 8 कोटीहून अधिक कर्मचारी EPFO चे सदस्य आहेत, तसेच 78 लाखांहून अधिक पेंशनधारक या योजनेंतर्गत आहेत. या नव्या निर्णयामुळे 8.78 कोटी नागरिकांना थेट फायदा होणार आहे. सरकारी धोरणांमुळे भविष्यात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना अधिक सुरक्षितता मिळेल.
ईपीएफओमध्ये मोठा बदल: UPI आणि एटीएमद्वारे पीएफ काढण्याची सुविधा
ताज्या अहवालांनुसार, मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून 2025 च्या सुरुवातीला EPFO एक मोठा बदल लागू करणार आहे. या बदलामुळे यूपीआय आणि एटीएमच्या मदतीने कर्मचारी आपले पीएफ (Provident Fund) त्वरित काढू शकतील. यापूर्वी पीएफ रक्कम मिळवण्यासाठी कर्मचार्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागत असे आणि त्याच्या मंजुरीसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत असे. मात्र, नवीन प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होईल.
यूपीआयद्वारे थेट खाते ट्रान्सफर शक्य
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, EPFO सदस्य आता थेट UPI प्लॅटफॉर्मवरून त्यांचा पीएफ बॅलन्स तपासू शकतील आणि आपल्या इच्छित बँक खात्यात झटपट रक्कम ट्रान्सफर करू शकतील. सध्या, पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम भरावा लागतो आणि त्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे लागू शकतात. मात्र, या नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना त्वरित पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.