PPF Interest Rate: केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या लहान बचत योजनांच्या (Small Savings Scheme) व्याज दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, एप्रिल ते जून 2025 या तिमाहीसाठी बचत योजनांचे व्याज दर पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर या योजनांच्या व्याज दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारने सध्याच्या दरात कोणताही बदल केला नाही.
कोणत्या योजनेवर किती व्याज मिळणार?
1 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या तिमाहीत विविध बचत योजनांचे व्याजदर पुढीलप्रमाणे असतील:
- PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) – 7.1%
- NSC (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) – 7.7%
- SCSS (ज्येष्ठ नागरिक बचत योजना) – 8.2%
- सुकन्या समृद्धी योजना (SSY) – 8.2%
या सर्व योजना पोस्ट ऑफिस बचत योजनांतर्गत येतात. हे व्याजदर 1 एप्रिल 2025 पासून लागू होऊन 30 जून 2025 पर्यंत कायम राहतील. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025) जाहीर केलेले व्याजदरच पुढील तिमाहीसाठी कायम ठेवण्यात आले आहेत.
व्याज दरात शेवटचा बदल कधी झाला होता?
वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने 28 मार्च 2025 रोजी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या व्याज दरांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. व्याज दरात शेवटचा बदल जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत करण्यात आला होता. त्यावेळी 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदर 7% वरून 7.1% करण्यात आला होता, तसेच सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8% वरून 8.2% करण्यात आला होता. त्यानंतर मात्र कोणत्याही व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सरकार दर 3 महिन्यांनी करते पुनरावलोकन
सरकारकडून लहान बचत योजनांचे व्याज दर दर 3 महिन्यांनी पुनरावलोकन करून निश्चित केले जातात. पोस्ट ऑफिस योजनांचे व्याज दर श्यामला गोपीनाथ समितीच्या शिफारशीनुसार ठरवले जातात. या शिफारशीनुसार, वेगवेगळ्या लहान बचत योजनांचे व्याज दर समकक्ष सरकारी बाँडच्या उत्पन्नावर 25 ते 100 बेसिस पॉइंटच्या मर्यादेत (100 बेसिस पॉइंट = 1%) ठेवले जातात. हे दर स्पर्धात्मक राहावेत आणि गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरावेत यासाठी ही पद्धत अवलंबली जाते.
सध्या व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय का?
भारतीय रिझर्व्ह बँकेने अलिकडेच रेपो दरात कपात केली असली, तरी सरकारने व्याज दरात घट करण्याचा निर्णय घेतलेला नाही. महागाईच्या प्रभावाचा विचार करून आणि गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन हे व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर स्थिर आणि आकर्षक परतावा मिळणार आहे.
Disclaimer: या लेखातील माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. गुंतवणुकीपूर्वी संबंधित बँक किंवा अधिकृत वेबसाइटवरून व्याज दर आणि अटींची पडताळणी करावी.