Mutual Funds SIP: आजकाल एसआयपी (Systematic Investment Plan) हा बहुतांश लोकांच्या पोर्टफोलियोचा भाग आहे. यातील अनेक वैशिष्ट्ये आणि मार्केट-लिंक्ड रिटर्न्स यामुळे ही योजना वेगाने लोकप्रिय होत आहे. मात्र, ही योजना बाजाराशी जोडलेली असल्याने तिचा परतावा देखील बाजाराच्या हालचालींवर अवलंबून असतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही SIP सुरू करत असाल, तर काही महत्त्वाच्या चुका टाळल्या पाहिजेत, कारण या चुका तुमच्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम करू शकतात.
गुंतवणुकीपूर्वी संशोधन न करणे
एसआयपी सुरू करण्यापूर्वी सखोल संशोधन करणे आवश्यक आहे. संशोधन न करता गुंतवणूक करणे नुकसानकारक ठरू शकते. जर तुम्हाला गुंतवणुकीचा पुरेसा अनुभव नसल्यास, तज्ञांची मदत घेणे अधिक सुरक्षित ठरेल.
SIP बंद करणे किंवा अडथळे आणणे
एकदा SIP सुरू केल्यानंतर ते नियमित ठेवणे महत्त्वाचे आहे. मधल्या काळात SIP थांबवू नये किंवा बंद करू नये, कारण यामुळे अपेक्षित परतावा मिळण्याची शक्यता कमी होते.
जास्त रक्कमेची SIP सुरू करणे
जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने मोठ्या रकमेची SIP सुरू करणे टाळावे. अनेकदा परिस्थिती बदलल्यास, मोठ्या रकमेची SIP कायम ठेवणे कठीण होऊ शकते आणि त्यात नफा मिळवण्याची संधी कमी होऊ शकते. त्यामुळे कमी रकमेच्या SIP सुरू केल्यास, त्यात सातत्य ठेवणे शक्य होते आणि अधिक फायदेशीर ठरू शकते.
बाजारातील चढ-उतारावर प्रतिक्रिया देणे
बाजारातील अस्थिरता पाहून आपल्या SIP मध्ये लगेच बदल करू नयेत. लाँग टर्म (Long Term) गुंतवणूक धोरणावर ठाम राहणे चांगले असते, कारण बाजारातील तात्पुरत्या चढ-उतारांचा तुमच्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
पोर्टफोलियोमध्ये विविधता न ठेवणे
सर्व पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नये. पोर्टफोलियोमध्ये विविधता असणे आवश्यक आहे. त्यासाठी लार्जकॅप (Largecap), मिडकॅप (Midcap) आणि स्मॉलकॅप (Smallcap) फंड्सचा समावेश करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून दीर्घकालीन परताव्याच्या संधी वाढतील.