Mukesh Ambani: भारत मोबाइल काँग्रेस 2024 (India Mobile Congress 2024) मध्ये रिलायन्स जिओने एक नवी तंत्रज्ञान प्रणाली सादर केली आहे, ज्यामुळे घरातील स्मार्ट TV सहजपणे संगणकात रूपांतरित होईल. या तंत्रज्ञानाचे नाव आहे Jio Cloud PC, ज्याद्वारे स्मार्ट TV ला संगणक म्हणून वापरता येईल.
यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन, स्मार्ट TV, कीबोर्ड, माउस आणि Jio Cloud PC अॅपची आवश्यकता आहे. जर स्मार्ट TV नसेल, तरीही काळजीचं कारण नाही. JioFiber किंवा JioAirFiber सोबत येणारा सेट-टॉप बॉक्ससुद्धा साध्या TV ला संगणकात बदलू शकतो.
Jio Cloud PC म्हणजे काय?
Jio Cloud PC ही एक अशी टेक्नोलॉजी आहे जी TV ला क्लाऊड कम्प्युटिंगशी जोडते. याचा वापर खूपच सोपा आहे. युजरला फक्त अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल आणि सर्व क्लाऊड डेटा थेट TV स्क्रीनवर दिसू लागेल. सर्वसाधारणपणे जे कामे संगणकावर केली जातात – जसे की ईमेल पाठवणे, मेसेंजर वापरणे, सोशल नेटवर्किंग, इंटरनेट ब्राउझिंग, स्कूल प्रोजेक्ट्स किंवा ऑफिस प्रेझेंटेशन – ती सगळी कामे आता TV वर सहज करता येतील.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर सर्व माहिती क्लाऊडमध्ये साठवली जाते आणि TV च्या माध्यमातून तुम्हाला सर्व्हर, स्टोरेज, डेटाबेस, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर आणि अॅनालिटिक्स यांसारख्या सेवांचा वापर करता येतो.
मिडिल क्लास वाल्यांसाठी उत्तम पर्याय
भारतातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना संगणक खरेदी करणे अवघड होते. अशा परिस्थितीत, Jio Cloud PC हा उत्तम पर्याय ठरतो. क्लाऊड कम्प्युटिंगची क्षमता गरजेनुसार कमी-जास्त केली जाऊ शकते, ज्यामुळे ही प्रणाली सुरक्षित तर आहेच, शिवाय पारंपरिक संगणकांच्या तुलनेत डेटा रिकव्हरी करणेही खूप सोपे होते. ही टेक्नोलॉजी फक्त TV पुरती मर्यादित नाही, तर मोबाईल डिव्हाइसवरदेखील काम करेल. त्यामुळे तुमच्या स्मार्ट TV सोबतच मोबाइलवरही याचा वापर करता येईल.
बाजारात कधी येणार?
सध्या रिलायन्स जिओने या अँपच्या लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, पुढील काही महिन्यांत हे तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे संगणकाचा वापर सर्वांसाठी सहज शक्य होईल, विशेषतः त्यांच्यासाठी जे महागडे संगणक खरेदी करू शकत नाहीत.