Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता याच वर्षी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अधिवेशन समाप्त झाल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी वर्ग करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार, या वर्षीच डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे आणि यामध्ये प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला 1500 रुपयांची रक्कम दिली जाईल.
डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीचे पाच हप्ते पात्र लाभार्थींच्या खात्यात यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत 1500 रुपयांच्या हप्त्यांप्रमाणे एकूण 7500 रुपये वर्ग करण्यात आले होते. निवडणुकांपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता. आता डिसेंबरसाठीची रक्कमही आजपासून खात्यात वर्ग केली जाणार आहे.
महिलांना डिसेंबरचा हप्ता महिनाअखेर मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेनुसार अधिवेशन संपल्यानंतर लगेच 1500 रुपयांची रक्कम वर्ग करण्यात येईल. डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या योजनेसाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केली जात आहे.
किती महिलांना मिळणार लाभ?
डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात वितरित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, 2 कोटी 35 लाख महिलांना 1500 रुपये मिळतील. महिला व बालकल्याण विभागाकडे निवडणुकीच्या आधी आलेल्या 25 लाख अर्जांची पडताळणी पूर्ण होताच, त्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात हप्ता दिला जाईल.
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी प्रतीक्षा करावी लागणार
महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात लाडकी बहीण योजनेसाठी 1500 रुपयांची रक्कम वाढवत ती 2100 रुपये करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांचाच असेल. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच महिलांना 2100 रुपयांची सुधारित रक्कम मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.