कोकण म्हाडाने तब्बल 25 वर्षांपूर्वीचे वचन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2000 मध्ये चितळसर, मानपाडा आणि टिकुजीनीवाडी येथील गृहप्रकल्पांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र योजना पुढेच गेली नाही आणि अनेकांना त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले. आता या जुन्या अर्जदारांसाठी कोकण मंडळाने पुन्हा दरवाजे खुले केले आहेत.
अर्जदारांना 15 जुलैला संमतीपत्र सादर करण्याची संधी
ज्या नागरिकांनी जून 2000 मध्ये अर्ज केले होते, त्यांच्यासाठी म्हाडाने 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता म्हाडा भवनातील गुलझारीलाल नंदा सभागृहात उपस्थित राहून संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. पात्र अर्जदारांना घर वाटप प्रक्रियेत सहभागी होण्याची ही महत्त्वाची संधी असेल.
2000 मध्ये अर्ज, पण योजना अडकली
त्याकाळी संकेत क्रमांक 138 आणि 139 अंतर्गत गृहप्रकल्पासाठी 156 अर्ज प्राप्त झाले होते. मात्र नियोजनाच्या अडचणीमुळे सोडत निघाली नाही. त्या जागेवर ठाणे महापालिकेने विस्थापित गृहनिर्माण योजनेसाठी आरक्षण प्रस्तावित केल्याने म्हाडाच्या योजनेला मान्यता मिळाली नाही आणि प्रकल्प रखडला.
2006 मध्ये प्रकल्पाला गती, आता तयार बहुमजली इमारत
2006 मध्ये स्वीस चॅलेंज पद्धतीने एक विकासक या जागेवर बहुमजली इमारत उभारण्याच्या कामात उतरला. आता तो प्रकल्प पूर्ण झाला असून गृहविक्रीसाठी सोडत प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. यामध्ये काही घरे जून 2000 मध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
पात्र अर्जदारांनाच मिळणार घर, नवीन दर लागू
15 जुलै रोजी संमतीपत्र व कागदपत्रांची छाननी होणार असून, केवळ अशाच अर्जदारांना घरे मिळतील ज्यांना अद्याप म्हाडा किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून घर मिळालेले नाही. पात्र अर्जदारांसाठी लॉटरी केवळ कोणत्या मजल्यावर कोणते घर दिले जाईल हे ठरवण्यासाठी घेतली जाणार आहे. या घरांसाठी नवीन विक्री दर लागू करण्यात येणार आहेत.

