फिक्स्ड डिपॉजिट (FD) आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवणं हे अनेकांचं सुरक्षित गुंतवणुकीचं प्राथमिक साधन आहे. पण बँक जर दिवाळखोरीत गेली किंवा बंद पडली, तर आपल्या FD आणि सेव्हिंग खात्यातले पैसे खरंच सुरक्षित असतात का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर अनेकांना माहीतही नसतं.
बँक बुडल्यावर किती रक्कम परत मिळते?
RBIच्या नियमानुसार, एखादी बँक बंद पडल्यास, तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतच रक्कम परत मिळते. ही सुरक्षा DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) कडून दिली जाते. यामध्ये तुमचा मूळ ठेवीसह जमा झालेला व्याज देखील समाविष्ट असतो. म्हणजेच, जर FD, सेव्हिंग्स आणि करंट खात्यांमध्ये मिळून तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील, तरी तुम्हाला फक्त 5 लाख रुपयेच मिळतील.
DICGC काय आहे आणि ते कसं कार्य करतं?
DICGC ही RBIची एक उपकंपनी आहे जी देशातील सर्व बँकांना डिपॉजिट इन्शुरन्स कव्हर देते. ग्राहकांकडून कुठलाही प्रीमियम घेतला जात नाही, तो बँक भरते. सुरुवातीला ही मर्यादा 1 लाख होती, पण 2020 मध्ये ती वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली. हे नियम सर्व कमर्शियल बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि भारतातल्या विदेशी बँकांच्या शाखांवर लागू होतात.
एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमधले खाते?
जर तुम्ही SBI सारख्या एखाद्या बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये खाते उघडलं असेल किंवा FD, सेव्हिंग आणि करंट अकाउंट्स वेगवेगळे असतील, तरी DICGC ते एकत्रितच मानते. त्यामुळे अशा वेळी मिळणारी कमाल रक्कम 5 लाखांपुरतीच मर्यादित राहते.
वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कम असल्यास?
जर तुमचं FD किंवा सेविंग्स वेगवेगळ्या बँकांमध्ये असेल, तर प्रत्येक बँकेतून 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहते. उदाहरणार्थ, A बँकेत 5 लाख आणि B बँकेत 5 लाख रुपये असल्यास, दोन्ही बँका बुडाल्या तरी तुम्हाला दोन्हींकडून मिळून 10 लाख रुपये परत मिळू शकतात.
FD, RD, सेव्हिंग – सर्व खात्यांवर लागू नियम?
होय, ही 5 लाखांची मर्यादा FD, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट आणि RD यांसाठी लागू होते. या सर्व खात्यांतील एकूण जमा रक्कम 5 लाखांहून अधिक असली, तरी मिळणारी हमी फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच असते.
पैसे परत मिळण्यास किती वेळ लागतो?
बँक बुडल्यावर, DICGC ला 90 दिवसांच्या आत संबंधित खातेदारांना रक्कम परत करावी लागते. यातील पहिल्या 45 दिवसांत बँक खातेधारकांची माहिती गोळा करते आणि पुढील 45 दिवसांत DICGC पैसे परत करतं.
आपले पैसे सुरक्षित ठेवण्याचा उपाय
FD किंवा सेविंगमध्ये मोठी रक्कम ठेवताना ती एकाच बँकेत न ठेवता, वेगवेगळ्या बँकांमध्ये वाटून ठेवा. यामुळे प्रत्येक बँकेसाठी 5 लाख रुपयांपर्यंतची सुरक्षा हमी तुम्हाला मिळू शकते.
Disclaimer:
ही माहिती जनसामान्यांना आर्थिक शिक्षण देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

