पोस्ट ऑफिसने आपल्या डिजिटल सेवेचा विस्तार करत आता आरडी (Recurring Deposit) आणि पीपीएफ (Public Provident Fund) खात्यांसाठीही ई-केवायसी (e-KYC) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही नवी सुविधा 7 जुलै 2025 पासून लागू करण्यात आली आहे. याआधी ही सुविधा केवळ एमआयएस, टर्म डिपॉझिट, किसान विकास पत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटसाठी मर्यादित होती.
आधार बायोमेट्रिकद्वारे व्यवहार सुलभ
नवीन आदेशानुसार, ग्राहक आता पोस्ट ऑफिसमध्ये आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे आरडी आणि पीपीएफ खाती उघडू शकतात, त्यात गुंतवणूक करू शकतात तसेच कर्ज देखील घेऊ शकतात. या खात्यांमधून निधी काढणेही आता सहज शक्य होणार असून कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. बायोमेट्रिक प्रमाणीकरणामुळे SB-7 फॉर्मसारख्या कागदपत्रांची गरज भासत नाही.
खाते उघडताना काही अटी लागू
जर ग्राहक आपले आरडी खाते डाकघर बचत खात्यातून रक्कम ट्रान्सफर करून उघडू इच्छित असेल, तर त्या बचत खात्याचा प्रकार ‘सिंगल’ किंवा ‘जॉइंट बी’ असणे आवश्यक आहे. हे खाते बायोमेट्रिकद्वारे सुरू होत असल्याने फॉर्म भरण्याची गरज नाही.
व्याज दरात कोणताही बदल नाही
जुलै ते सप्टेंबर 2025 तिमाहीसाठी सरकारने पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. तीन वर्षांच्या टर्म डिपॉझिटसाठी व्याजदर 7.1% कायम राहील. पीपीएफ आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स अकाऊंटचे व्याजदर अनुक्रमे 7.1% आणि 4% इतकेच राहणार आहेत. किसान विकास पत्रावर 7.5% व्याज मिळेल आणि ते 115 महिन्यांमध्ये परिपक्व होईल. एनएससीसाठी व्याजदर 7.7% तर मासिक उत्पन्न योजनेसाठी 7.4% कायम ठेवण्यात आला आहे.
Disclaimer: वरील माहिती सरकारी आदेशावर आधारित असून यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. गुंतवणुकीपूर्वी अधिकृत वेबसाइट किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

