RBI Imposed Panelty For HDFC and Axis Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) नियमांची पायमल्ली आणि आर्थिक गैरव्यवहारांमुळे देशातील दोन प्रमुख बँकांवर कारवाई करत मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत देशातील सर्वांत मोठ्या खासगी बँका, एचडीएफसी (HDFC Bank) आणि अॅक्सिस बँक (Axis Bank), यांचा समावेश आहे.
एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेनं आरबीआयकडून आखून देण्यात आलेल्या नियमानुसार कार्यवाही न केल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही बँकांच्या खातेधारकांना सदर कारवाईविषयी माहिती देण्यासाठी बँकांनी अधिकृत पत्रक जारी केलं आहे.
आरबीआयची करडी नजर
देशातील सर्व आर्थिक संस्था आणि बँकांच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँक नेहमीच बारकाईने लक्ष ठेवून असते. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांना सूट देण्याचं धोरण आरबीआयकडून कधीच स्वीकारलं जात नाही. अशाच प्रकारे एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकांवरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत, या दोन्ही बँकांना मिळून 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहक सेवांमध्ये बेजबाबदारपणा आणि केव्हायसी (KYC) प्रक्रियेतील त्रुटी या कारणांमुळे बँकांवर ही कारवाई झाली आहे.
HDFC Bank ला 1 कोटींचा दंड
एचडीएफसी बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ठेवींवरील व्याजदर, रिकवरी एजंट्स आणि बँक ग्राहक सेवांसाठीच्या निर्देशांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई झाली आहे.
Axis Bank ला 1.91 कोटींचा दंड
अॅक्सिस बँकेला 1.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट (Banking Regulation Act) अंतर्गत नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई झाली आहे.
सामान्य खातेधारकांवर परिणाम नाही
बँकांनी आपल्या अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे की, या कारवाईमुळे सामान्य खातेधारकांच्या दैनंदिन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांना चिंता करण्याचं कारण नाही.

