द. अफ्रिका कसोटी: रोहित शर्मा करणार डावाची सुरुवात?

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अंतिम संघातून लोकेश राहुलला वगळण्यात आल्यानं सलामीला कोण येणार हा प्रश्न आता टीम इंडियाला सतावतो आहे. ही जबाबदारी भारताचा स्टार फलंदाज व वन-डे क्रिकेटमधील सलामीवीर रोहित शर्मा याच्यावरच सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.

लोकेश राहुल हा सलामीवीर म्हणून अपयशी ठरला आहे. मागील १२ डावांमध्ये त्याला एकदाही ५० चा आकडा पार करता आला नाही. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या मालिकेतही सलामीवीर म्हणून त्याला फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं त्याला वगळण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला. त्याच्या ऐवजी रोहित शर्मा हा मयांक अग्रवाल सोबत सलामीला येईल, असा अंदाज आहे.

रोहितनं डावाची सुरुवात करावी, असा सल्ला भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यानं काही दिवसांपूर्वीच दिला होता. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी देखील तसे संकेत दिले आहेत. रोहितनं कसोटीतही डावाची सुरुवात करावी, अशी आमची इच्छा असल्याचं संघाची घोषणा करताना त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं रोहित सलामीला येणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतकं लगावणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं ४० च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. रोहित आतापर्यंत २७ कसोटी सामने खेळला आहे. नवी जबाबदारी तो यशस्वीपणे पेलतो का, याबद्दल उत्सुकता आहे.

जगातील एक उत्तम संघ असूनही भारताला सलामीच्या जोडींची चिंता नेहमीच सतावत आली आहे. २०१८ पासून आतापर्यंत भारतानं कसोटी सामन्यांमध्ये सात फलंदाजांना आलटून-पालटून सलामीची संधी दिली आहे. केएल राहुल, मुरली विजय, शिखर धवन, पृथ्वी शॉ, पार्थिव पटेल, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी यांनी डावाची सुरुवात केली आहे. केएल राहुल याला सर्वाधिक १३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यानं २३ वेळा भारतीय डावाची सुरुवात केली आहे. त्यानं सर्वाधिक ४९१ धावा केल्या आहेत. मात्र, धावांच्या सरासरीची तुलना करता तो चौथ्या स्थानावर आहे.